कोपरा प्रकरणातील आरोपीला तत्काळ अटक करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:32 IST2021-03-19T04:32:20+5:302021-03-19T04:32:20+5:30
अंबाजोगाई : लातूर जिल्ह्यातील २६ वर्षांच्या मुलीवर काही जणांनी अमानूष अत्याचार करून जबर मारहाण केली. सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवकाचाही ...

कोपरा प्रकरणातील आरोपीला तत्काळ अटक करा
अंबाजोगाई : लातूर जिल्ह्यातील २६ वर्षांच्या मुलीवर काही जणांनी अमानूष अत्याचार करून जबर मारहाण केली. सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवकाचाही या प्रकरणात सहभाग असून, गावातील काही महिलांनी सदर प्रकरणात गुंडांना मदत केल्याचे निदर्शनास येत आहे. माणुसकीला काळिमा फासणारी घटना असून, सदर प्रकरणात पोलीस यंत्रणा आरोपीला अभय देत आहे. १६पैकी केवळ २ आरोपी अटक झाल्याने लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यात संतापाची लाट उसळली आहे. उर्वरित आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी अंबाजोगाई मराठा क्रांती मोर्चाने उपजिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.
सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे आणि पीडित मुलीला पोलीस संरक्षण देऊन तिचे पुनर्वसन करण्याची मागणी क्रांती मोर्चाची आहे.
या प्रकरणातील पीडित मुलीवर येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू असून, तिच्यावर अमानूषपणे अत्याचार करत जबर मारहाण केलेली आहे. दरम्यान, या प्रकरणातील पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी आता मराठा क्रांती मोर्चा पुढे सरसावला असून, शहरातील क्रांती मोर्चाच्या बांधवांनी एकत्रित येऊन दवाखान्यात पीडित मुलीची प्रत्यक्ष भेट घेतली. एवढेच नव्हे तर उपजिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन सविस्तर निवेदन दिले. सामूहिक अत्याचार करणाऱ्यावर व त्यांच्या साथीदारावर शक्ती कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा. उर्वरित आरोपींचा शोध घेऊन तत्काळ अटक करावी. सदर प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवावे. पीडित मुलीला पोलीस संरक्षण द्यावे. तिचे पुनर्वसन करावे. एवढेच नाही तर या प्रकरणात तिच्या कुटुंबियावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. ते मागे घ्यावेत. कर्तव्यात कसूर करत आरोपीला पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना तत्काळ निलंबित करावे, अशा अनेक मागण्या क्रांती मोर्चाने केल्या आहेत.