ड्रोन फवारणीत पीक जळाल्याची पोलिसात तक्रार दिल्याचा राग; शेतकऱ्यावर केला तलवारीने वार
By सोमनाथ खताळ | Updated: July 13, 2024 19:35 IST2024-07-13T19:30:28+5:302024-07-13T19:35:48+5:30
विशेष म्हणजे हल्ला करणाऱ्या तिघासह महिलेकडे तलावारी होत्या.

ड्रोन फवारणीत पीक जळाल्याची पोलिसात तक्रार दिल्याचा राग; शेतकऱ्यावर केला तलवारीने वार
कडा (बीड) : ड्रोनच्या साह्याने शेतात फवारणी केल्याने शेजारील शेतकऱ्याची सव्वा एकर भेंडी जळून नुकसान झाले. याची तक्रार पोलीस ठाण्यात केल्याने राग अनावर झालेल्या चौघांनी एकावर तलवारीने हल्ला केल्याची घटना समोर आली असून तो शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत.
आष्टी तालुक्यातील वाकी येथील दादा अस्वर हे भावकीतील एकाची शेती वाट्याने करत आहेत. ११ जुलै रोजी सकाळी ते शेतात पिकाची पाहणी करण्यासाठी गेले असता, संदिप, सुरेश व सपना अस्वर यांनी नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करून शिवीगाळ केल्याने आष्टी पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. याचाच राग मनात धरून शुक्रवारी दादा अस्वर याचा भाऊ अशोक मच्छिंद्र याचा जारचे पाणी विक्रीचा व्यवसाय आहे. त्याचा शुक्रवारी सकाळी संदीप सुरेश अस्वर, राजेंद्र सुरेश अस्वर, सुरेश नारायण अस्वर व सुरेशची पत्नी यांनी पाठलाग करत मिरजगाव (जि.अहमदनगर) येथे एका ठिकाणी पाणी देण्यासाठी थांबला असता त्याच्यावर तलवारीने हल्ला केला. यात तो गंभीर जखमी झाला असून अहमदनगर येथील खाजगी रूग्णालयात उपचार घेत आहे. ही घटना एका घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्याचे फुटेज समोर आले आहेत.
गावच्या सरपंच कुटुंबाकडून शेतकऱ्यावर हल्ला!
सदरील शेतकऱ्याने तक्रार केल्याचा राग मनात धरून वाकी गावच्या सरपंच असलेल्या महिलेच्या कुटुंबातील व्यक्तींनी हा हल्ला केला आहे. विशेष म्हणजे हल्ला करणाऱ्या तिघासह महिलेकडे तलावारी होत्या. दिवसाढवळ्या तलवारी घेऊन हल्ला चढवल्याने या तलवारी व एवढे धाडस आले कुठून? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.