मराठा आरक्षणासाठी आता परळीत बेमुदत ठिय्या आंदोलन, मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2023 19:33 IST2023-09-02T19:33:09+5:302023-09-02T19:33:20+5:30
याच ठिकाणी सन 2018 मध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी 21 दिवस आंदोलन करण्यात आले

मराठा आरक्षणासाठी आता परळीत बेमुदत ठिय्या आंदोलन, मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार नाही
परळी( बीड) : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासंदर्भात शांततेने आंदोलन चालू असताना आंदोलकावर लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांना निलंबित करावे. मराठा समाजाचा सरसकट ओबीसीमध्ये समावेश करावा या व इतर मागणीसाठी परळी तहसील कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आज पासून ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले.
यापूर्वी परळी तहसील कार्यालयासमोरील मैदानावर सन 2018 मध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी 21 दिवस आंदोलन करण्यात आले होते, संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचे केंद्रबिंदू झाले होते आता याच ठिकाणी पुन्हा एकदा मराठा क्रांती मोर्चा परळीच्या वतीने याच ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार असल्याचा इशारा देवराव लुगडे महाराज यांनी याप्रसंगी बोलताना दिला आहे. यावेळी आंदोलकांनी मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे ,आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं , जय भवानी जय शिवाजी ,अश्या घोषणा देण्यात आल्याने तहसील कार्यालय दणाणून गेले.