अंबाजोगाईत व्यापाऱ्याची चार लाखांची बॅग पळविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 23:56 IST2018-10-04T23:56:21+5:302018-10-04T23:56:54+5:30
शहरातील गजबजलेल्या हाऊसिंग सोसायटी भागातून भरदिवसा मोटारसायकलवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी आडत व्यापा-याची चार लाखांची रक्कम असलेली बॅग लंपास केली. ही घटना बुधवारी सकाळी ११.४५ वाजता घडली.

अंबाजोगाईत व्यापाऱ्याची चार लाखांची बॅग पळविली
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई: शहरातील गजबजलेल्या हाऊसिंग सोसायटी भागातून भरदिवसा मोटारसायकलवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी आडत व्यापा-याची चार लाखांची रक्कम असलेली बॅग लंपास केली. ही घटना बुधवारी सकाळी ११.४५ वाजता घडली.
धर्मराज किसनराव बिरगड यांचे अंबाजोगाईतील मोंढ्यात आडत दुकान आहे. सध्या सोयाबीनचा सीजन असल्याने बिरगड यांना रोजच बँकेतून लाखावर रक्कम काढून आणून ती ग्राहकांना वाटप करावी लागते. गुरूवारी सकाळी साडेअकरा वाजता त्यांनी अंबाजोगाई पीपल्स बँकेतून ३ लाख ८७ हजार २०० रुपये काढून पिशवीत ठेवले आणि ती पिशवी स्कुटी गाडीवर (एमएच ४४ आर २९६५) दोन्ही पायाच्या मध्ये ठेवली. ते योगेश्वरी प्राथमिक शाळेपासून वळून मोंढ्याच्या दिशेने निघाले असता ११.४५ वाजताच्या सुमारास मागून मोटारसायकल वरून आलेल्या दोघा युवकांनी ओव्हरटेक करताना त्यांना ‘पाठीमागे तुमचे पैसे पडले आहेत’ अशी बतावणी केली. याला भुलून बिरगड यांनी गाडी वळविली आणि खाली वाकून पडलेले पैसे उचलू लागले. ही संधी साधून चोरट्यांनी त्यांची पैश्याची बॅग घेऊन पोबारा केला. यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असणारे भूषण ठोंबरे यांनी चोरट्यांचा पाठलाग केला, परंतु ते सापडले नाहीत. अखेर धर्मराज बिरगड यांनी अंबाजोगाई शहर पोलीस ठाणे गाठून चोरीची तक्रार दिली. या प्रकरणी दोघा अनोळखी चोरट्यांवर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून तपास सहा. पोलीस निरीक्षक मारोती मुंडे करत आहेत.