बीडमध्ये नगराध्यक्ष पदासाठी सर्वच पक्षांकडून शोधाशोध; गेवराईतून पहिली उमेदवारी जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 15:36 IST2025-11-12T15:35:44+5:302025-11-12T15:36:05+5:30
बीडचे राजकारण : दुसऱ्या दिवशी चार ठिकाणी एकही अर्ज नाही

बीडमध्ये नगराध्यक्ष पदासाठी सर्वच पक्षांकडून शोधाशोध; गेवराईतून पहिली उमेदवारी जाहीर
बीड : जिल्ह्यात सहा नगरपालिकांसाठी निवडणूक होत आहे. अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशी चार ठिकाणी एकही अर्ज आला नाही. गेवराई आणि परळीत खाते उघडले आहे. तसेच बीडमध्ये नगराध्यक्ष पदासाठी एक सामान्य चेहरा नसल्याने सर्वच पक्षांकडून शोधाशोध सुरू आहे, तर गेवराईत राष्ट्रवादी अजित पवार गटाने एकाची थेट उमेदवारीही जाहीर करून टाकली आहे. इतर ठिकाणीही नगराध्यक्ष पदासाठीचा सस्पेन्स कायम आहे.
जिल्ह्यात बीडसह माजलगाव, गेवराई, धारूर, परळी आणि अंबाजोगाई या सहा नगरपालिकांसाठी निवडणूक होत आहे. यासाठी नगराध्यक्ष पदासाठीचे आरक्षण जाहीर होताच महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून नगराध्यक्ष पदासाठी सक्षम उमेदवाराचा शोधाशोध सुरू झाला. सर्वच पक्षांनी दोन-दोन दिवस मुलाखती घेतल्या. त्यात चर्चापासून ते खर्चापर्यंतची सर्वच माहिती घेतली, पण अद्याप तरी गेवराईतील एक पक्ष वगळता इतर कोणत्याही पक्षाने अधिकृत अशी उमेदवारी जाहीर केलेली नाही. त्यामुळे कोणत्या पालिकेसाठी आणि कोणत्या पक्षाकडून कोण उमेदवार असणार? याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
गेवराईत महायुती होणे अशक्य
गेवराईत राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आ. विजयसिंह पंडित, माजी आ. अमरसिंह पंडित आणि भाजपकडून माजी मंत्री बदामराव पंडित व बाळराजे पवार मैदानात आहेत. हे दोन्ही पक्ष महायुतीत असले तरी त्यांच्यात युती होणे कठीण दिसत आहे. जागावाटपाचे ठरण्याआधीच माजी आ. अमरसिंह पंडित यांनी आपल्या पक्षाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केला. भाजपकडूनही अनेक नावांची चर्चा सुरू आहे.
पंकजा मुंडे - सुरेश धसांचे मन जुळेल का?
भाजपने जिल्हा प्रभारी म्हणून मंत्री पंकजा मुंडे, तर प्रमुख म्हणून आ. सुरेश धस यांची नियुक्ती केली; परंतु दोघेही अद्याप भेटलेले नाहीत. नगरपालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवसापर्यंत त्यांच्यात उघडपणे राजकीय बैठक झालेली नाही. त्यामुळे त्यांचे मन जुळेल का? हा प्रश्न आहे.
दुसऱ्या दिवशी परळी, गेवराईत अर्ज
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी प्रतिसाद थंड राहिला आहे. मंगळवारपर्यंत बीड, धारूर, अंबाजोगाई आणि माजलगाव या चारही नगरपालिकांमध्ये नगराध्यक्ष किंवा नगरसेवक पदासाठी एकही अर्ज दाखल झालेला नाही. केवळ दोन ठिकाणी नाममात्र अर्ज दाखल झाले आहेत. गेवराईत नगराध्यक्ष पदासाठी एक अर्ज आला. परळीत नगराध्यक्ष पदासाठी एक अर्ज आणि नगरसेवक पदासाठी दोन अर्ज दाखल झाले.
असे आहे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण
बीड - महिला (अनुसूचित जाती)
अंबाजोगाई - पुरुष/महिला (खुला)
परळी - महिला (खुला)
माजलगाव - महिला (नागरिकांचा मागास प्रवर्ग)
गेवराई - महिला (खुला)
धारूर - पुरुष/महिला (खुला)