सारी स्वप्ने राहिली अधुरी, अंगणात उभ्या सख्ख्या बहिणींना जीपने चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2021 15:58 IST2021-12-21T15:53:04+5:302021-12-21T15:58:39+5:30

नागरिकांनी जीपचा पाठलाग सुरू केला, त्यानंतर चालकाने जीप उभी करून पलायन केले.

All the dreams remained unfulfilled, two sisters standing in the yard was crushed by the jeep | सारी स्वप्ने राहिली अधुरी, अंगणात उभ्या सख्ख्या बहिणींना जीपने चिरडले

सारी स्वप्ने राहिली अधुरी, अंगणात उभ्या सख्ख्या बहिणींना जीपने चिरडले

पाटोदा (बीड) : जेवण करून दारापुढे अंगणात उभ्या असलेल्या दोन सख्ख्या बहिणींना भरधाव जीपने जोराची धडक दिली. या अपघातात दोन्ही बहिणी गंभीररीत्या जखमी होऊन ठार झाल्या. ही घटना रविवारी रात्री साडेआठ वाजता तालुक्यातील धनगर जवळका येथे घडली.

रोहिणी गाडेकर (२६), मोहिनी गाडेकर (२२) अशी मृत बहिणींची नावे आहेत. रोहिणी ही नर्सिंगचे शिक्षण घेत होती तर मोहिनी एका खासगी कंपनीत काम करीत होती. या दोघी बहिणी आपल्या गावी धनगर जवळका येथे आल्या होत्या. रात्री जेवण केल्यानंतर दारासमोर उभ्या राहिल्या असतानाच भरधाव वेगाने आलेल्या जीपने त्यांना जोराची धडक दिली. यात दोघी गंभीररीत्या जखमी होऊन ठार झाल्या.

दोघींना चिरडल्यानंतर जीपने पुढे एका दुचाकीला धडक दिली. यात अजित मोरे व संतोष आगे हे जखमी झाले. त्यानंतर चालकाने जीपे सुसाट चालवून पलायनाचा प्रयत्न केला, परंतु नागरिकांनी त्याचा पाठलाग सुरू केला. त्यानंतर जीप उभी करून त्याने पलायन केले. पाटोदा पोलिसांनी जीप ताब्यात घेत गुन्हा नोंद करण्यात आला.

कुटुंबीयांचा आक्रोश
सामान्य कुटुंबातील दोघी बहिणी मोठ्या कष्टाने शिक्षण घेऊन पुढे गेल्या होत्या. सुटीत गावी आल्यानंतर त्यांचा एकाच वेळी अपघातीमृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर सोमवारी त्यांचे मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन केले. अंत्यसंस्कारावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.

Web Title: All the dreams remained unfulfilled, two sisters standing in the yard was crushed by the jeep