‘आका’चे पाय आता खोलात, तपास होईपर्यंत धनंजय मुंडेंनी बिनखात्याचे मंत्री राहावे - सुरेश धस
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 12:50 IST2025-01-04T12:49:27+5:302025-01-04T12:50:53+5:30
माजी पालकमंत्री व कृषिमंत्री यांनी काही अधिकार ‘आका’कडे दिले होते. त्यामुळे त्यांच्या शिफारशीवरूनच जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या पोस्टिंग होतात...

‘आका’चे पाय आता खोलात, तपास होईपर्यंत धनंजय मुंडेंनी बिनखात्याचे मंत्री राहावे - सुरेश धस
बीड : संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण होऊन दोषारोपपत्र जाईपर्यंत धनंजय मुंडे यांनी बिनखात्याचे मंत्री राहावे. अजित पवार यांनी त्यांना बाजूला करावे. तसेच अजित पवारांनी पालकमंत्री व्हावे. ते जिल्हा सरळ करतील, असा विश्वास भाजपचे आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केला. तसेच आता ‘आका’चे पाय खाेलवर गेले असून, तो सुटण्याची शक्यता कमी आहे, असे सांगत वाल्मीक कराडबद्दलही नाव न घेता भाष्य केले.
माजी पालकमंत्री व कृषिमंत्री यांनी काही अधिकार ‘आका’कडे दिले होते. त्यामुळे त्यांच्या शिफारशीवरूनच जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या पोस्टिंग होतात. परळीत राखेचे भयाण वास्तव आहे. माजी पालकमंत्र्यांच्या कुटुंबातील लोकच दीडशे गुंड घेऊन जातात आणि पिचिंग तोडून राख नेतात. माझ्याकडे सर्व व्हिडीओ आहेत. आता पर्यावरण खाते बीडला आले आहे. पर्यावरण विभाग आणि प्रदूषण महामंडळाने याची तपासणी करावी, असेही आमदार धस म्हणाले.
‘मैं कितना डेंजर हूँ...’
विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यात मी किती डेंजर आहे, हे दाखविण्याची चढाओढ लागली होती. त्यातूनच हा प्रकार झाला. मैं कितना डेंजर हूँ... हे वाल्मीक आण्णाला दाखविण्यासाठी सुदर्शनने मारहाण केल्याचा संशयही आमदार धस यांनी व्यक्त केला.
साडी नेसून पोलिसानेच पिस्तूल ठेवले
करुणा मुंडे या परळीत आल्या होत्या. यावेळी त्यांच्या वाहनात साडी नेसून आलेल्या व्यक्तीने पिस्तूल ठेवले. ही व्यक्ती पोलिसच होती. हे सर्व ‘आका’च्या सांगण्यावरूनच झाल्याचा गौप्यस्फाेट आमदार धस यांनी केला. त्याचे नाव आपण पोलिस अधीक्षकांना देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.