एएचटीयूची बीड शहरात कारवाई ; कुंटणखान्यावर छापा, चार महिलांची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 01:24 IST2018-09-04T01:23:29+5:302018-09-04T01:24:07+5:30
महिलांना देहविक्रीच्या व्यवसायात ढकलणाऱ्या आटींला बेड्या ठोकून चार पीडित महिलांची सुटका करण्यात आली. तसेच दोन ग्राहकांनाही जेरबंद केले. ही कारवाई शहरातील ग्रामसेवक कॉलनीत रविवारी सायंकाळी करण्यात आली.

एएचटीयूची बीड शहरात कारवाई ; कुंटणखान्यावर छापा, चार महिलांची सुटका
बीड : महिलांना देहविक्रीच्या व्यवसायात ढकलणाऱ्या आटींला बेड्या ठोकून चार पीडित महिलांची सुटका करण्यात आली. तसेच दोन ग्राहकांनाही जेरबंद केले. ही कारवाई शहरातील ग्रामसेवक कॉलनीत रविवारी सायंकाळी करण्यात आली.
शांताबाई तुळशीराम डोंगरे (६८, रा. ग्रामसेवक कॉलनी) असे कुंटणखाना चालविणा-या आंटीचे नाव आहे. मागील अनेक दिवसांपासून शांताबाई ही कुंटणखाना चालवित होती. बीड शहरासह जिल्ह्यातील महिलांना ती वेश्या व्यवसायात ढकलत होती. हीच माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला (एएचटीयू) मिळाली. त्यांनी ग्रामसेवक कॉलनीत सापळा लावला.
डमी ग्राहकाला पाठवून खात्री करवून घेतली. इशारा मिळताच दबा धरुन बसलेल्या एएचटीयूच्या अधिकारी व कर्मचाºयांनी धाड टाकली. यावेळी चार पीडित महिलांची सुटका करुन दोन ग्राहकांना अटक केली. याप्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. राजीव तळेकर, पो. उप नि. भारत माने, दीपाली गीते, कर्मचारी प्रताप वाळके, सिंधू उगले, सुरेखा उगले, मीना घोडके, नीलावती खटाणे, सतीश बहिरवाळ, शेख शमीम पाशा, विकास नेवडे यांनी केली.
कुंटणखान्याबाबत मुलगा, सून अनभिज्ञ
शांताबाई ही डोंगरे स्वत:च्या घरातच कुंटणखाना चालवित होती. तिचा मुलगा व सून कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर ती ग्राहकांना घरी बोलावून घेत असे. याबाबत मात्र मुलगा व सून यांना कसलीही खबर नसल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. तसा जवाबही त्या दोघांनी दिल्याचे समजते.