अहिल्यानगरच्या बाप-लेकाची बीडमध्ये दिवसा बंद घरांची पाहणी, रात्री घरफोडी; मुलाला बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 18:15 IST2025-12-11T18:13:43+5:302025-12-11T18:15:34+5:30
स्थानिक गुन्हे शाखेची अहिल्यानगर जिल्ह्यात जाऊन कारवाई

अहिल्यानगरच्या बाप-लेकाची बीडमध्ये दिवसा बंद घरांची पाहणी, रात्री घरफोडी; मुलाला बेड्या
बीड : दिवसा बंद घरांची पाहणी करून घरफोडी करणाऱ्या एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अहिल्यानगर जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे केज आणि धारूर पोलिस ठाण्यांतील दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला ८ डिसेंबर रोजी गोपनीय माहिती मिळाली की, केज (संभाजी खडे यांचे घर) आणि धारूर (बाबाजी दपलजी यांचे घर) येथील दोन घरफोडीचे गुन्हे अहिल्यानगर जिल्ह्यातील वाळुंज पारगाव शिवारात राहणारे अक्षय अस्मातूर काळे आणि त्याचे वडील अस्मातूर मोहन काळे यांनी मिळून केले आहेत. पथकाने तातडीने आरोपीच्या घरी जाऊन अक्षय (वय २२) याला अटक केली. त्याने चौकशीत वडिलांसह गुन्हे केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी अक्षयकडून चोरीला गेलेले २९ ग्रॅम सोन्याचे दागिने, ५ तोळे चांदीचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली होंडा शाईन दुचाकी जप्त केली आहे. तर अस्मातूर काळे याचा शोध सुरू आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे शिवाजी बांटेवाड आणि पोउपनि. स्वप्नील उनवणे (केज) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोउपनि. महेश विघ्ने, हवालदार महेश जोगदंड, राजू पठाण, भागवत शेलार, सोमनाथ गायकवाड, बाळू सानप, राजू वंजारे, बप्पासाहेब घोडके, अर्जुन यादव, मनोज परजणे, शमीम पाशा, चालक गणेश मरकडे व सिद्धेश्वर मांजरे यांनी कारवाई केली.