मराठा क्रांती मोर्चाचे परळीत रोखठोक आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 00:25 IST2018-11-26T00:25:01+5:302018-11-26T00:25:16+5:30
पुन्हा एकदा परळी तहसीलसमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रोखठोक आंदोलन सुरुकरण्यात आले आहे.

मराठा क्रांती मोर्चाचे परळीत रोखठोक आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : ठरलेल्या कालमर्यादेत शासनाने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. मराठा क्रांती मोर्चाने तब्बल २१ दिवस परळीमध्ये ठिय्या आंदोलन केले होते. त्यावेळी मराठा समाजाला शासनाने विविध मागण्यांच्या संदर्भात दिलेले कोणतेही आश्वासन पाळले गेलेले नाही. समाजाच्या विविध मागण्या शासनाने आजपर्यंत विचारात घेतल्या नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा परळी तहसीलसमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रोखठोक आंदोलन सुरुकरण्यात आले आहे.
मराठा समाजाला आरक्षण देताना भूतकाळाप्रमाणे दिशाभूल न करता ठोस आणि कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण द्यावे, कोपर्डी घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या नावांमध्ये मराठा नावाचा उल्लेख करावा व कर्ज वितरणाची प्रक्रिया सुलभ व सुटसुटीत करून बँकांना कर्जवितरण सक्तीचे करावे, २१ दिवस चाललेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या दरम्यान शहीद झालेल्या मराठा आंदोलकांच्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत करावी, न्याय हक्कासाठी आंदोलनात उतरलेल्या मराठा आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत, अशा आशयाचे निवेदन शासनाला १८ जुलै ते ७ आॅगस्ट दरम्यान चाललेल्या आंदोलनादरम्यान दिले होते. उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत या सर्व मागण्या १५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण कराव्यात अन्यथा पुन्हा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला होता. दिलेल्या कालमर्यादेत एकही मागणी पूर्ण न झाल्याने परळीत पुन्हा तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे, असे आंदोलकांनी यावेळी सांगितले.