कडा : एचआयव्हीच्या अफवेमुळे संपूर्ण कुटुंबाला वाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार आष्टी तालुक्यात समोर आला आहे. ही अफवा पसरविण्यात आरोग्य विभाग आणि पोलिसांचा हात असल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे. पोटचा गोळा गेल्याचे दु:ख पचत नाही, तोच गावाने वाळीत टाकल्यामुळे या कुटुंबाने हतबलता व्यक्त केली आहे.
मुलीचा एचआयव्हीमुळे मृत्यू झाल्याची खोटी माहिती पोलिस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितल्यामुळे कुटुंबाची समाजात बदनामी झाली. तसेच गावातील लोकांनी आम्हाला वाळीत टाकले. कुणीही भेटायला जवळ येत नाही. आमच्यासोबतचे व्यवहारही थांबवले आहेत, अशी आपबीती पीडित कुटुंबाने सांगितली. तसेच या आरोपांमुळे घरातल्या महिलेने दोन वेळा जीवन संपविण्याचा प्रयत्न केला, असा दावाही कुटुंबाने केला आहे.
डॉक्टर, पोलिसांविरोधात तक्रारपीडित कुटुंबाने डॉक्टर आणि पोलिस कर्मचाऱ्याविरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. एक ऑडिओ क्लिपही त्यांनी दाखविली. ही क्लिप पोलिस कर्मचाऱ्याची असल्याचे पीडित कुटुंबाचे म्हणणे आहे. तुमच्या मुलीला एचआयव्ही होता. तिच्या अंत्यविधीला जवळ ज्या व्यक्ती होत्या, त्यांची तपासणी करून घ्या, असे या क्लिपमधली व्यक्ती म्हणत आहे. ही व्यक्ती पोलिस असल्याचा दावा कुटुंबाने केला आहे.
आम्हाला न्याय द्यामुलीच्या सासरच्या लोकांच्या सांगण्यावरून पोलिस आणि डॉक्टरांनी अशी अफवा पसरवल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे. ‘आमची मुलगी गेली, पण जवळचे लोकही भेटायला आले नाहीत. या अफवेमुळे कुणीही आमच्याजवळ येत नाही. आरोग्य विभागाने खोटा अहवाल दिला आहे, सासरच्या मंडळींच्या सांगण्यावरून हे झाले आहे, आम्हाला न्याय द्या,’ अशी मागणी कुटुंबाने केली आहे.
काय म्हणतात अधिकारी..?मृत महिलेच्या कुटुंबाने आरोप केल्यानंतर आष्टी येथील वैद्यकीय अधिकारी डाॅ. सुरेश ढाकणे म्हणाले, असा काही प्रकार मी सांगितला नाही आणि सांगण्याचा विषय येत नाही. जे कारण डाॅक्टरांनी सांगितले, तेच मी त्यांच्या नातेवाइकांना सांगितले. दुसरा काही विषय नसून मी मनाने कशासाठी सांगेल, असे पोलिस हवालदार बबुशा काळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
जगावे की मरावे?मुलीला हा असला काही आजार झालाच नव्हता. ज्या दवाखान्यात ती उपचार घेत होती, त्या फाईल पाहून त्यांनी तसा अंदाज लावून आजार झाल्याचे कारण समोर आणले. शवविच्छेदन अहवालातदेखील असे काही समोर आले नाही. आमची आरोग्य विभाग व पोलिस प्रशासनाने नाहक बदनामी केल्याने जगावे की मरावे, अशी अवस्था झाली आहे. गावात आमच्या सोबत कोणी बोलत नाही की घरीदेखील येत नसल्याचे मृत मुलीच्या कुटुंबाने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.