लुटीचा डाव फसल्याने शेळी चोरून पोबारा केला, रॉंगसाईडने जाताना चोरट्यांनी जीव गमावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2021 15:00 IST2021-12-24T14:59:37+5:302021-12-24T15:00:33+5:30
महामार्गावर दुचाकीविरुद्ध दिशेने वळवून पळ काढण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला.

लुटीचा डाव फसल्याने शेळी चोरून पोबारा केला, रॉंगसाईडने जाताना चोरट्यांनी जीव गमावला
बीड : महामार्गावर वाहनांना अडवून लुटण्याचा डाव फसल्यानंतर एक शेळी चोरुन दुचाकीवरुन पोबारा करणारे दोन चोरटे अपघातात ठार झाले तर एक जखमी आहे. तालुक्यातील चौसाळ्याजवळ २२ डिसेंबर रोजी पहाटे हा अपघात झाला.
भैया भारत काळे (१८) आणि तात्या प्रल्हाद काळे (दोघे रा. खामकरवाडी, जि. उस्मानाबाद) अशी मृतांची नावे आहेत तर विजय शहाजी शिंदे हा जखमी झाला आहे. विजयवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चौसाळा बाह्यवळणाजवळ लुटीच्या उद्देशाने काही वाहनांवर दगडफेक करण्याचा प्रयत्न या तिघांनी केला होता. याची माहिती वाहनधारकांनी नेकनूर ठाण्यात फोनवरुन दिल्यानंतर गस्तीवरील पोलिसांनी शोध सुरू केला होता. या दरम्यान, वाहनलुटीचा प्रयत्न फसल्याने तिघांनी परिसरातील एका शेतकऱ्याची शेळी चोरुन दुचाकीवरुन पळ काढला होता.
अज्ञात वाहनाची धडक
महामार्गावर दुचाकीविरुद्ध दिशेने वळवून पळ काढण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. यामध्ये अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात भैया काळे व तात्या काळे यांचा मृत्यू झाल्याची माहिती नेकनूर ठाण्याचे सहायक निरीक्षक मुस्तफा शेख यांनी दिली.