बीडमधील ऊसतोड मजुरांसाठी ‘आयुर्मंगलम’नंतर ‘मिशन साथी’ योजना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 13:18 IST2025-08-05T13:17:36+5:302025-08-05T13:18:11+5:30

अजित पवारांच्या हस्ते होणार सुरुवात : प्रत्येक गटात एक आरोग्य साथी महिला

After 'Ayurmangalam', 'Mission Saathi' scheme for sugarcane workers in Beed! | बीडमधील ऊसतोड मजुरांसाठी ‘आयुर्मंगलम’नंतर ‘मिशन साथी’ योजना!

बीडमधील ऊसतोड मजुरांसाठी ‘आयुर्मंगलम’नंतर ‘मिशन साथी’ योजना!

बीड : जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांसाठी ऑक्टोबर २०१० मध्ये माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते ‘आयुर्मंगलम’ ही योजना सुरू झाली होती. परंतु त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली नाही. आता पुन्हा एकदा ‘मिशन साथी’ ही योजना हाती घेण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गुरुवारी (दि. ७) याची सुरुवात होणार आहे. ‘लोकमत’ने प्रकाश टाकल्यानंतर प्रशासनाने यासाठी पुढाकार घेतला आहे.

बीड हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळेच त्यांचे आरोग्य व इतर सुविधांसाठी ‘आयुर्मंगलम’ ही योजना सुरू करण्यात आली होती. परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षाने ही योजना सक्षम राहिली नाही. त्यामुळेच २०१९ मध्ये ऊसतोडीला जाणाऱ्या महिलांच्या गर्भपिशवी शस्त्रक्रिया झाल्याचे प्रकरण समोर आले होते. त्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या समितीने नवीन ‘एसओपी’ ठरवून दिल्या. त्याचीही सुरुवातीचे एक-दाेन वर्षच प्रभावी अंमलबजावणी झाली. आता त्याकडेही दुर्लक्ष झाले.

‘लोकमत’ने प्रकाश टाकल्यावर जाग
२ जून रोजी ‘लोकमत’ने २०२५ पूर्वी ८४३ ऊसतोड कामगारांची शस्त्रक्रिया झाल्याचे वृत्त प्रकाशित करून मुद्द्यावर प्रकाश टाकला. त्यानंतर बीडपासून ते दिल्लीपर्यंत खळबळ उडाली. हाच मुद्दा संसदेतही चर्चेत आला. त्यानंतर प्रशासन आणि शासन उपाययोजना करण्यासाठी धावपळ करत आहे. याचा लाभ ऊसतोड मजूर महिलांना होणार आहे.

२०१९ मध्ये काय घडले?
एप्रिल २०१९ मध्ये गर्भपिशवी शस्त्रक्रियांचा मुद्दा ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणला होता. त्याच्या चौकशीसाठी विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली २६ जून २०१९ रोजी समिती गठित केली. तेव्हा केलेल्या सर्वेक्षणात ८२ हजारांपैकी १३ हजार महिलांच्या गर्भपिशवी शस्त्रक्रिया झाल्याची बाब उघड झाली होती. त्यानंतर २१ जून २०१९ रोजी अतिरिक्त संचालकांनी एसओपीसंदर्भात पत्र काढत शस्त्रक्रिया करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांची परवानगी बंधनकारक केली.

‘मिशन साथी’ योजना काय?
या योजनेतून ऊसतोड कामगारांचे सर्वेक्षण करून नोंदणी करत प्रत्येकाला ओळखपत्र देणार. महिलांची नियमित आरोग्य तपासणी होणार. प्रत्येक गटात (टोळी) एक महिला कामगारच ‘आरोग्य साथी’ म्हणून काम करणार. तिला आरोग्य विभागाकडून प्रशिक्षण देऊन प्रथमोपचार किट देणार. गावांतील आशाताईंसह इतर आरोग्य कर्मचारी तिच्या संपर्कात राहणार. दुसऱ्या जिल्ह्यात, परराज्यात गेल्यावरही तेथून ती बीडमध्ये संपर्क साधणार.

गटातीलच एक महिला ‘आरोग्य साथी’
‘मिशन साथी’ ही योजना ७ ऑगस्ट रोजी ‘लाँच’ करत आहोत. यात गटातीलच एक महिला ‘आरोग्य साथी’ म्हणून काम करेल. नोंदणी, ओळखपत्र, योजनांची माहिती पुस्तिका हे सर्व कामगारांना देणार आहोत. तसे नियोजन आहे.
- विवेक जॉन्सन, जिल्हाधिकारी, बीड

Web Title: After 'Ayurmangalam', 'Mission Saathi' scheme for sugarcane workers in Beed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.