खून, दरोड्याचा तपास २४ दिवसानंतरही अपूर्णच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 00:08 IST2019-04-25T00:07:44+5:302019-04-25T00:08:30+5:30
एका वृद्धेचा खून करून सव्वासात लाख रूपयांचा ऐवज घेऊन दरोडेखोरांनी पोबारा केला होता. या घटनेला २४ दिवस उलटूहनी अद्याप पोलिसांचा तपास अपूर्णच आहे.

खून, दरोड्याचा तपास २४ दिवसानंतरही अपूर्णच
बीड : एका वृद्धेचा खून करून सव्वासात लाख रूपयांचा ऐवज घेऊन दरोडेखोरांनी पोबारा केला होता. या घटनेला २४ दिवस उलटूहनी अद्याप पोलिसांचा तपास अपूर्णच आहे. तपास पथकांवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. दरम्यान, दरोडेखोरांना पकडण्यात अपयश आल्याने गेवराईत नागरिकांच्या मनातील भिती कायम आहे. पोलिसांबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.
१ एप्रिल रोजी पुष्पा शर्मा यांचा खून करून दरोडेखोरांनी घरातील जवळपास सव्वा सात लाख रूपयांचा ऐवज लंपास केला होता. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. एकीकडे ही घटना घडलेली होती, तर दुसऱ्या बाजुला लोकसभा निवडणुकांचा बंदोबस्त. मात्र आता निवडणूका संपून गेलेल्या आहेत. याप्रकरणाचा तपास करीत असलेले पथकेही आता सुस्तावले आहेत. पोलिसांचा हा संथगतीने सुरू असलेला तपास नागरिकांच्या मनात भिती वाढविणार ठरत आहे. तब्बल २४ दिवस उलटूनही या प्रकरणाचा तपास न लागल्याने पोलिसांबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. तर तपासी पथकांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
सीसीटीव्ही फुटेज ताब्यात
पोलिसांनी या घटनेत परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. यामध्ये त्यांना एक व्यक्ती संशयास्पदरित्या जाताना दिसत आहे. पोलिसांकडून त्याचा शोध घेणे सुरु आहे.
तपास पथके नावालाच
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सध्या स्थानिक गुन्हे शाखा, दरोडा प्रतिबंधक पथक आणि गेवराई पोलीस असे तीन पथके नियूक्त केलेली आहेत.
ही पथके केवळ नावालाच राहिले आहेत. त्यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.