शेतीला तंत्रज्ञानाची जोड; पिकावर ड्रोनद्वारे कीटकनाशकाच्या फवारणीने वेळ आणि खर्चाची बचत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 20:11 IST2022-07-21T20:10:14+5:302022-07-21T20:11:23+5:30
सध्या शेतकऱ्यांना मशागत, श्रमाची कामे करण्यासाठी पुरेसे मजूर मिळत नाहीत अशी परिस्थिती आहे

शेतीला तंत्रज्ञानाची जोड; पिकावर ड्रोनद्वारे कीटकनाशकाच्या फवारणीने वेळ आणि खर्चाची बचत
- दीपक नाईकवाडे
केज (बीड) :शेतकरी आता नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कमी श्रमात जास्त उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. केज तालुक्यातील शेतकऱ्यांनी ड्रोनच्या सहाय्याने शेतात कीटकनाशकांची फवारणी केली त्यामुळे शेतकऱ्याचा वेळ आणि पैसा दोन्हीमध्ये बचत होणार आहे.
सध्या शेतातील कामासाठी मजूर मिळणे अवघड झाले आहे. शेतकऱ्यांना अंतरगत मशागत, श्रमाची कामे करण्यासाठी मजूर मिळत नाहीत. त्यातच वाढीव मजुरी देऊनही मजूर वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी आता आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तालुक्यातील इस्थळ येथील प्रगतिशील शेतकरी हनुमंत गोपीनाथ काळदाते व अशोक नामदेव शिंदे यांनी कृषी सहाय्यक गोविंद टोपे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. या शेतकऱ्यांनी ड्रोनद्वारे सोयाबीन पिकावर यशस्वीरीत्या फवारणी केली. यामुळे शेतकऱ्यांचा पैसा, वेळ आणि श्रमाची बचत होत आहे. यावेळी ड्रोनद्वारे सुरू असलेली सोयाबीन फवारणी पाहण्यासाठी ग्रामस्थ आणि परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.
शेतीत तंत्रज्ञानाचा वापर वाढवा
ड्रोनद्वारे कमी वेळेत आणि कमी खर्चात फवारणी शक्य आहे. मनुष्यबळापेक्षा अवघ्या अर्ध्या दरात ड्रोनने फवारणी होते.
- गोविंद टोपे, कृषी सहायक