बोगस विमा प्रकरणात ९६ सीएससींवर कारवाई, २२ आयडी एकट्या परळीमधील 

By शिरीष शिंदे | Updated: February 4, 2025 12:14 IST2025-02-04T12:13:54+5:302025-02-04T12:14:50+5:30

Crop Insurance Scam: राज्यातील इतर जिल्ह्यातही असा प्रकार  आढळून आला होता. परभणी जिल्ह्यात खोट्या कागदपत्रांद्वारे बोगस पीक विमा भरला होता.

Action taken against 96 CSCs in bogus crop insurance case, investigation reveals that 22 IDs are from Parli | बोगस विमा प्रकरणात ९६ सीएससींवर कारवाई, २२ आयडी एकट्या परळीमधील 

बोगस विमा प्रकरणात ९६ सीएससींवर कारवाई, २२ आयडी एकट्या परळीमधील 

बीड : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत खरीप हंगाम २०२४ मध्ये पीक विमा पोर्टलवर बोगस विमा भरण्यात आला होता. भौगोलिक क्षेत्र नसलेल्या गावात अवैध पीक विमा भरणाऱ्या राज्यासह परराज्यातील ९६ सीएससींचे आयडी ब्लॉक करण्यात आले आहेत. यात बीड जिल्ह्यातील ३५, तर २२ हे माजी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा मतदारसंघ असलेल्या परळीमधील आहेत. 

बीड जिल्ह्यातील शासकीय जमीन शेत दाखवून काहींनी बनावट पीक विमा भरल्याचे प्रकरण ‘लोकमत’ ने समोर आणले होते. त्यानंतर राज्यभरातील पीक विमा पडताळणीला सुरुवात झाली होती. 

राज्यातील इतर जिल्ह्यातही असा प्रकार  आढळून आला होता. परभणी जिल्ह्यात खोट्या कागदपत्रांद्वारे बोगस पीक विमा भरला होता. कोणतेही भौगोलिक क्षेत्र अस्तित्वात नसताना तेथे खोटे सातबारा, आठ-अ सारखे महसुली अभिलेख तयार करून एकूण ९६ सीएससी आयडीधारकांच्या आयडीमधून पीक विमा नोंदणी करून शासनाची फसवणूक करण्यात आली होती. त्यामुळे सदरील ९६ सीएससी आयडी ब्लॉक करण्याची सूचना कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी सीएससी कंपनीला केली होती. 

बीड जिल्ह्यात ३५ आयडी 

बनावट पीक विमा भरणारे ३५ सीएससीधारक हे बीड जिल्ह्यातील आहेत. त्यापैकी २२ जणांचे सीएससी आयडी हे परळी शहर व तालुक्यातील आहेत. उर्वरित अंबाजोगाईतील ६, बीडमधील १ व इतर ६ आयडीधारक हे इतर तालुक्यांतील असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.  

इतर राज्यांतील ७ आयडी

महाराष्ट्रात बनावट पीक विमा भरणारे ७ सीएससीधारक हे इतर राज्यांतील आहेत. उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यातील २, बंदा जिल्ह्यातील अत्तारा येथील १, हरदोई जिल्ह्यातील २, तर हरयाणा राज्यातील रोहतक जिल्ह्यातील २ यांचा समावेश आहे. 

विमा रद्दची कारवाई सुरू 

बनावट पीक विमा भरणाऱ्या लोकांचे विमा प्रस्ताव विमा कंपनीने रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आतापर्यंत जवळपास १ लाखापेक्षा अधिक विमा प्रस्ताव रद्द करण्यात आले आहेत. आणखी काही बनावट प्रस्ताव असतील तर रद्द केले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Action taken against 96 CSCs in bogus crop insurance case, investigation reveals that 22 IDs are from Parli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.