दारूच्या अवैध वाहतुकीवर कारवाई; ३१ बॉक्स साठा जप्त, दोघे अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2023 19:02 IST2023-10-09T19:02:09+5:302023-10-09T19:02:33+5:30
आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलिसांची कारवाई

दारूच्या अवैध वाहतुकीवर कारवाई; ३१ बॉक्स साठा जप्त, दोघे अटकेत
- नितीन कांबळे
कडा- पिंपरखेड बसस्थानकाजवळ एका वाहनातून अवैध रित्या दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनावर रविवारी रात्री ९ वाजता कारवाई करण्यात आली. पोलिसांनी ३ लाख ६९ हजार ८४० रुपये किंमतीचे ३१ बॉक्स दारू साठा जप्त करत दोघेजणांना अटक केली.
आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे,पोलिस अंमलदार शिवदास केदार, चालक बाळासाहेब जगदाळे हे रविवारी रात्री ९ ते१० वाजेच्या दरम्यान पेट्रोलिंग करत होते. धानोरा गावच्या दिशेने एक वाहन संशयितरित्या जात असताना वाहन थांबण्याचा इशारा पोलिसांनी केला. मात्र,चालकाने वाहन वेगात पुढे नेले.पोलिसांनी पाठलाग करून पिंपरखेड बसस्थानकाजवळ वाहन (क्रमांक एम.एच १६ ए.वाय.३०१३) पकडले. वाहनात देशीविदेशी दारूचे ३१ बॉक्स आढळून आले. पोलिसांनी दारू आणि वाहन असा एकूण ३ लाख ६९ हजारांचा मुद्देमाल जप्त करत रियाज राजू शेख,गोविंद किसनराव चन्ने ( रा.केडगाव. अहमदनगर) यांना अटक केली. पुढील तपास उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवि देशमाने करीत आहेत.