मित्रास पंढरपूरला सोडायला जाताना अपघात; अकोल्याचा शिक्षक बीडमध्ये ठार
By सोमनाथ खताळ | Updated: June 7, 2023 19:48 IST2023-06-07T19:47:27+5:302023-06-07T19:48:09+5:30
पालीच्या घाटात अपघात, हेल्मेट असल्याने एकजण बचावला

मित्रास पंढरपूरला सोडायला जाताना अपघात; अकोल्याचा शिक्षक बीडमध्ये ठार
बीड : पंढरपुरला निघालेल्या दोन मित्रांच्या दुचाकीला बीड तालुक्यातील पालीच्या घाटात अपघात झाला. यात शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा हेल्मेटमुळे बचावला. मयत शिक्षक हे अकोला जिल्ह्यातील आहेत. हा अपघात बुधवारी दुपारी घडला.
दामोधर महादेव डाकोरे (वय ३७ रा.चोंडी ता.पातूर जि.अकोला) असे मयत शिक्षकाचे नाव असून सतीश गजानन झाटे (वय २४ रा.आटूल ता.पातूर जि.अकोला) हे जखमी आहेत. दामोधर व सतीश हे जीवलग मित्र आहेत. दामोधर हे पंढरपूर जिल्ह्यात शिक्षक असून शाळा भरणार असल्याने ते जात होते. त्यांना सोडण्यासाठी सतीश हे देखील सोबत होते. बुधवारी दुपारी पालीच्या घाटात लोडींग ट्रकला (जीजे १० टीवाय ९२८१) पाठिमागून दुचाकीने (एमएच १३ ईबी ८४७१) जोराची धडक दिली.
यात सतीश दुचाकी चालवत होते, आणि डोक्याला हेल्मेट असल्याने त्यांच्या डोक्याला कमी मार लागला. परंतू दामोधर हे पाठिमागे बसलेले असल्याने आणि ट्रकवर डोके आदळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही माहिती समजातच महामार्गचे पोलिस उपनिरीक्षक आर.के.नागरगोजे व त्यांची टीम घटनास्थळी पोहचली. आयआरबीच्या रूग्णवाहिकेला बोलावून घेत जखमी व मयताला जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले. सध्या तरी सतीश यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. मयत व जखमींच्या नातेवाईकांना याची माहिती दिली असून ते बीडला येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.