Accident: भरधाव एसयुव्ही कारने रिक्षाला उडवले; भीषण अपघातात चारजण जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 19:16 IST2022-06-02T19:15:43+5:302022-06-02T19:16:45+5:30
अपघात एवढा भीषण होता की रिक्षाच्या चिंधड्या झाल्या तर इनोव्हाच्या सर्व एअरबॅग उघडल्या गेल्या.

Accident: भरधाव एसयुव्ही कारने रिक्षाला उडवले; भीषण अपघातात चारजण जागीच ठार
अंबाजोगाई (बीड) - तालुक्यातील होळ येथे आज गुरुवारी सायंकाळी ५ वाजता इनोव्हा आणि ऍपे रिक्षाची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघात चौघे जागीच ठार झाले. तर चार जण गंभीर जखमी आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भरधाव वेगात असलेल्या इनोव्हा कारने (एमएच १६ सीएन ७००) होळ येथे आपे रिक्षाला जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की रिक्षाच्या चिंधड्या झाल्या तर इनोव्हाच्या सर्व एअरबॅग उघडल्या गेल्या. या अपघातात रिक्षाचा चालक बालाजी संपती मुंडे (वय २८, रा. पिसेगाव, ता. केज), मच्छिन्द्रसिंग चरणसिंग डोके (वय ३५) यांच्या सह तीन महिने आणि एक वर्षे वय असलेल्या दोन बालकांचा समावेश आहे.
तर गंभीर जखमी असलेल्या दोन महिला आणि दोन पुरुषांवर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमीपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. चालक वगळता इतर मृत आणि जखमी शिकलकरी समाजाचे असून एकाच कुटुंबातील आहेत.