घातपात की अपघात! बेपत्ता विवाहितेचा विहीरीत आढळला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 13:53 IST2023-11-29T13:52:53+5:302023-11-29T13:53:57+5:30
आष्टी तालुक्यातील धामणगांव येथील घटना

घातपात की अपघात! बेपत्ता विवाहितेचा विहीरीत आढळला मृतदेह
- नितीन कांबळे
कडा- कौटुंबिक कलह सुरू असल्याने २६ नोव्हेंबर पासून घरातून बेपत्ता झालेल्या २५ वर्षीय विवाहितेचा मृतदेह आज सकाळी त्याच्या घराजवळील विहीरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. कोमल श्रीकांत राऊत ( २५) असे त्या महिलेचे नाव आहे.
आष्टी तालुक्यातील साबलखेड माहेर असलेल्या कोमल हिचा काही वर्षापूर्वी धामणगांव येथील श्रीकांत कल्याण राऊत याच्याशी विवाह झाला होता.सुरवातीचे काही वर्ष सुखी संसार सुरू होता.पण नंतर सासरकडील मंडळी तिला त्रास देत असल्याने ती २६ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या दरम्यान सगळे झोपेत असताना घराला बाहेरून कडी लावून बेपत्ता झाली होती. बेपत्ता झाल्याची तशी नोंद पती श्रीकांत कल्याण राऊत यांनी २७ नोव्हेंबर रोजी अंभोरा पोलिस ठाण्यात दिली. मात्र, आज सकाळी कोमल यांचा मृतदेह घराशेजारील विहीरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
माहिती मिळताच अंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे,पोलीस उपनिरीक्षक रवि देशमाने,पोलीस हवालदार बाबासाहेब गर्जे, संतोष क्षीरसागर, लुईस पवार, पोलीस अंमलदार शिवदास केदार, अमोल शिरसाठ, अमोल ढवळे यांनी घटनास्थळी पाहणी केली. पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.
मुलीचा घातपात झाल्याचा संशय
कोमल हिला गेल्या अनेक महिन्यांपासून सासरकडील मंडळी त्रास देत होते.तिचा सारखा मानसिक त्रास केला जात होता. मृतदेह विहीरीत आढळून आल्याने घातपात झाल्याचा संशय कोमलच्या माहेरच्या नातेवाईकांनी उपस्थित केला आहे.