पुण्याजवळ अपघात, बीड जिल्ह्यातील डोमरी येथील भोंडवे कुटूंबातील चिमुकलीसह चौघे ठार
By सोमनाथ खताळ | Updated: February 21, 2023 18:30 IST2023-02-21T18:29:43+5:302023-02-21T18:30:26+5:30
कार चालवत असलेला मुलगा बचावला, मात्र कुटुंबाला पोरका झाला

पुण्याजवळ अपघात, बीड जिल्ह्यातील डोमरी येथील भोंडवे कुटूंबातील चिमुकलीसह चौघे ठार
बीड : पुणे-नगर रस्त्यावर, कारेगाव (ता. शिरूर) जवळ फलके मळ्यानजीक रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरवर मागच्या बाजूने कार आदळून झालेल्या अपघातात एकाच कुटूंबातील चौघे ठार झाले. तर गाडी चालवणारा तरुण गंभीर जखमी आहे. मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास हा अपघात झाला.
सुदाम शंकर भोंडवे (वय ६६), सिंधुताई सुदाम भोंडवे (वय ६०), कार्तिकी अश्विन भोंडवे (वय ३२) व आनंदी अश्वीन भोंडवे (वय ४ वर्षे, सर्व रा. डोमरी, ता. पाटोदा, जि. बीड) अशी या अपघातातील मृतांची नावे असून, अश्विन सुदाम भोंडवे (वय ३५) हे या अपघातात जखमी झाले. ते कार चालवित होते. त्यांच्यावर कारेगाव मधील खासगी रूग्णालयात उपचार चालू असल्याचे सांगण्यात आले.
प्राथमिक माहिती नुसार अश्विन भोंडवे यांच्या चाकण येथील मेहुण्याला लग्नासाठी पाहुणे बघायला येणार असल्याने ते कारमधून (क्र. एमएच १२ ईएम २९७८) चाकणकडे चालले होते. जाण्यापूर्वीच त्यांच्यावर काळाने घाला घातला. सध्या डोमरी गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मुलगा बचावला, कुटुंबातील इतरांचा मृत्यू
भोंडवे कुटुंब हे शैक्षणिक कार्यात अग्रेसर आहे. पाटोदा तालुक्यात सोनदरा गुरूकुल संस्थेचे संचालक सुदाम भोंडवे संचालक होते. चाकणला जाताना अश्विन गाडी चालवत होता. अपघात तो बचावला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. आई-वडील, पत्नी आणि चार वर्षांची चिमुकली दगावल्याची त्याला माहिती नाही.