अबब! जिल्हाधिकारी, सीएसकडूनच कोरोना नियम पायदळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:34 IST2021-03-05T04:34:00+5:302021-03-05T04:34:00+5:30
बीड : कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांनी तात्काळ कोरोना चाचणी करून होम क्वारंटाईन होणे अपेक्षित आहे. यामुळे कोरोना संसर्ग पसरणार ...

अबब! जिल्हाधिकारी, सीएसकडूनच कोरोना नियम पायदळी
बीड : कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांनी तात्काळ कोरोना चाचणी करून होम क्वारंटाईन होणे अपेक्षित आहे. यामुळे कोरोना संसर्ग पसरणार नाही. परंतु, चक्क जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांनीच कोरोना नियम पायदळी तुडविल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. संपर्कात येऊनही चाचणी अथवा क्वारंटाईन न होता बिनधास्त हे अधिकारी फिरताना दिसत आहेत.
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आणि मृत्यूदर वाढत चालला आहे. प्रशासन व आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याबाबत आवाहन केले जात आहे. तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना करून कोरोना नियम पाळण्याबाबत आवाहन केले जात आहे. परंतु, इतरांना ज्ञान देणारे अधिकारीच याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वी बीडचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी थोडा थकवा जाणवत असल्याने कोरोना चाचणी केली होती. यात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. चाचणी करण्यापूर्वीच त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीस हजेरी लावली होती. या बैठकीला जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, सीईओ अजित कुंभार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते यांच्यासह इतर अधिकारी आणि व्यापारी उपस्थित होते. मास्क, सोशल डिस्टन्स ठेवला असला, तरी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या नियमानुसार हे सर्व लोक हाय रिस्कमध्ये येतात. हायरिस्क लोकांनी कोरोना चाचणी करावी, तर लो रिस्क लोकांनी होम क्वारंटाईन होणे अपेक्षित असते. परंतु, सीईओ वगळता सर्वांनीच हे नियम पायदळी तुडविल्याचे दिसत आहे.
आता यांच्यावर कोण कारवाई करणार?
होम क्वारंटाईन नियम तोडला अथवा कोरोना चाचणी न करणाऱ्यांविरोधात बीडमध्येच कारवाया करण्यात आलेल्या आहेत. हा कालावधी साधारण सहा महिन्यांपूर्वीचा आहे. एखादी व्यक्ती चाचणी करण्यास येत नसेल, तर पोलिसांची मदत घेऊन आणण्यात आले. सामान्यांवर दबाव टाकण्यात आला. परंतु, आता याच बड्या अधिकाऱ्यांनी सर्व नियम पायदळी तुडविले आहेत. आता यांच्यावर कारवाई कोण करणार? असा सवाल उपस्थित होत आहे.
सीएसची कार्यक्रमाला हजेरी
कर्णबधिर दिनाच्यानिमित्ताने जिल्हा रुग्णालयातील धन्वंतरी सभागृहात कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला सीएस डॉ. गित्ते यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमाला इतर अधिकारी, कर्मचारी व सामान्य नागरिकही उपस्थित होते. यावर बोलताना डाॅ. गित्ते म्हणाले, मी कार्यक्रमाला हजर होतो, परंतु, दूर होतो. तसेच डबल मास्क होता.
सीईओंचा अहवाल निगेटिव्ह
कोरोनाकाळात सीईओ अजित कुंभार यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि नियम पाळण्यात ते पुढे होते. या प्रकरणातही त्यांनी तात्काळ कोरोना चाचणी करून घेतली. यात त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. इतरांना नियम सांगताना कुंभार यांनी नियमांचे पालन केल्याचे दिसते.
कोट
मी कोरोना चाचणी अद्याप केलेली नाही. संपर्कात आल्यापासून किमान चार दिवसांचा कालावधी जाऊ देणे अपेक्षित असते. क्वारंटाईन रहायला पाहिजे. सर्व नियम पाळून चालू आहे. कोरोना चाचणी करणार आहे.
डॉ. सूर्यकांत गित्ते, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड
कोट
बैठकीला आम्ही सोशल डिस्टन्स ठेवला होता. मला काही लक्षणे नसल्यामुळे मी कोरोना चाचणी केलेली नाही.
रवींद्र जगताप,
जिल्हाधिकारी, बीड