पंढरीच्या वाटेत दर पाच किमीवर आपला दवाखाना अन् १० खाटांचे आयसीयू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 14:00 IST2025-06-12T13:59:05+5:302025-06-12T14:00:02+5:30
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : १२ लाख १४ हजार वारकरी १०७९ दिंड्यांत चालणार

पंढरीच्या वाटेत दर पाच किमीवर आपला दवाखाना अन् १० खाटांचे आयसीयू
बीड : ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता विठू नामाचा गजर करत राज्यातील १०७९ दिंड्यांतून १२ लाख ३४ हजार वारकरी ६ जुलैच्या आषाढी एकादशीसाठी पंढरपूरच्या दिशेने चालायला सुरूवात झाली आहे. त्यादृष्टीने आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. सलग तिसऱ्या वर्षी 'आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी' या उपक्रमांतर्गत आरोग्य विभागाने नियोजन करत प्रत्येक पाच किमी अंतरावर असे २०३ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाने स्थापन केले आहेत. तसेच ४६ ठिकाणी १० खाटांचे तात्पुरते आयसीयू स्थापन केले आहेत. २०२४ मध्ये १५ लाख लोकांना आरोग्य सेवा दिली होती. पालखी सोहळ्याच्या नियोजनासाठी ५ व १९ मे रोजी बैठका झालेल्या आहेत. आता १२ जून रोजी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर हे याचा आढावा घेणार आहेत.
११५५ मनुष्यबळ
वारकऱ्यांच्या सेवेसाठी जवळपास ११५५ मनुष्यबळाचे नियोजन केले आहे. यात १६१ विशेष तज्ज्ञ, डॉक्टर २८६ यांच्यासह नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्ष-किरण तज्ज्ञ, फार्मासिस्ट आदींचा समावेश आहे.
खासगीच्या १० खाटा आरक्षित
शासकीय आयसीयू, आपला दवाखाना यासोबतच पालखी मार्गावर असणाऱ्या प्रत्येक खासगी रुग्णालयातही १० खाटा आरक्षित ठेवण्याच्या सूचना पुणे उपसंचालकांनी दिल्या आहेत. तसेच दिंड्यांसाेबत २९० आरोग्यदूत असणार आहेत.
बाळ खुशीत, आईच्या कुशीत
पालखी सोहळ्यात आरोग्य विभागाचा एक चित्ररथ जनजागृतीसाठी असेल. तसेच सोहळ्यात कर्तव्य बजावणाऱ्या प्रत्येकाला टोपी, टी-शर्ट, रूमाल दिला जाणार आहे. त्यावर 'बाळ खुशीत, आईच्या कुशीत', 'स्वच्छतेशी दोस्ती, आरोग्यापासून मुक्ती', 'मुलगा-मुलगी एकसमान, दोन्ही वाढवतात कुटुंबांची शान', दोन मुले गुटगटीत, संसार आमचा सुटसुटीत, असे संदेश लिहिले आहेत. तसेच टँकर, रुग्णवाहिका यावरही संदेश लिहून जनजागृती केली जाणार आहे.
६६ जणांना अटॅक, ४२६ जणांना कुत्रा चावला
दिंडीत चालत असताना अनेक वृद्धांसह इतरांना आरोग्याच्या समस्या उद्भवतात. २०२४ मध्ये अशाच १५ लाख १२ हजार ७७४ वारकऱ्यांवर उपचार केले होते. यात ५४६७ जणांना ॲडमिट केले होते. ४९५० जणांना रेफर केले. तसेच २६६७ जणांना सारी, २४७९३ आयएलआय, १६९२८ डायरीया, ७८६० जुलाब, ४४९८२ ताप, ६६ हर्ट अटॅक, २८७ अपघातात जखमी, ४२६ कुत्रा चावला, ११ सर्पदंश इतर १४ लाख ९ हजार २८७ रुग्णांचा समावेश होता.
नावीन्यपूर्ण ठळक बाबी काय?
आरोग्यदूत - २९०
महिलांसाठी स्वतंत्र स्त्रीरोग तज्ज्ञ - १५
मुक्कामाच्या ठिकाणी हिरकणी कक्ष - ३७
दिंडी प्रमुखांसाठी औषधी किट - ३५००
रुग्णवाहिका - ३३१
आयसीयू कक्ष - ४६
आपला दवाखाना २०३
तत्पर आरोग्य सेवा
पालखी सोहळ्याचे नियोजन झाले आहे. १२ जून रोजी आरोग्यमंत्री बैठक घेणार आहेत. वारकऱ्यांचे हाल होणार नाहीत, त्यांना आरोग्य सेवा तत्पर मिळावी, यासाठीच 'आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी' हा उपक्रम हाती घेतला आहे.
- डॉ.आर.बी.पवार, उपसंचालक पुणे