बस-दुचाकीच्या समोरासमोर धडकेत तरूणाचा जागीच मृत्यू; बीड-अहमदनगर मार्गावर अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2023 14:03 IST2023-03-11T14:02:52+5:302023-03-11T14:03:20+5:30
बीड-नगर राष्ट्रीय महामार्गावरील चिंचोडी पाटील येथील घटना

बस-दुचाकीच्या समोरासमोर धडकेत तरूणाचा जागीच मृत्यू; बीड-अहमदनगर मार्गावर अपघात
- नितीन कांबळे
कडा ( बीड) : बस व दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकीवरील तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या दरम्यान बीड-नगर राष्ट्रीय महामार्गावरील चिंचोडी पाटील गावाजवळील पुलानजीक रात्री आठच्या दरम्यान घडली. हरिओम दिगंबर घोडके ( ३०, रा.सुलेमान देवळा ता.आष्टी) असे मृताचे नाव आहे.
उमरखेडहून बस ( क्रमांक एम.एच ४०,वाय ५९२३ ) शुक्रवारी रात्री अहमदनगरकडे जात होती. दरम्यान, हरिओम घोडके आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा येथे वेल्डिंग व्यवसाय करतो. शुक्रवारी रात्री तो अहमदनगर येथून बुलेट गाडीवर वेल्डिंग साहित्य घेऊन येत होता.
अहमदनगर जिल्ह्यातील चिंचोडी पाटील नजीक एका पुलाजवळील वळणावर रात्री आठच्या सुमारास बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यात दुचाकीस्वार तरुण हरिओम याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या अपघाती निघानाने गावात हळहळ व्यक्त होत आहे.