झोपडीत वाढलेल्या कुस्तीपटूस सुवर्णाचा 'तुरा'! बीडच्या सनी फुलमाळीचा बहरैनमध्ये पराक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 20:02 IST2025-11-08T19:58:58+5:302025-11-08T20:02:07+5:30
सनीचे वडील सुभाष फुलमाळी नंदीबैल घेऊन भविष्य सांगतात, तर आई सुई-दाभण विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.

झोपडीत वाढलेल्या कुस्तीपटूस सुवर्णाचा 'तुरा'! बीडच्या सनी फुलमाळीचा बहरैनमध्ये पराक्रम
- नितीन कांबळे
कडा (बीड): अत्यंत हलाखीच्या आणि प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करत एका मराठमोळ्या तरुणाने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा गौरव वाढवला आहे. आष्टी तालुक्यातील पाटसरा येथील सनी फुलमाळी याने बहरैन येथे झालेल्या आशियाई युवा कुस्ती स्पर्धेत ६० किलो गटात सुवर्णपदक पटकावत ऐतिहासिक यश संपादन केले आहे. झोपडीत वाढलेल्या सनीचा हा प्रवास कोणत्याही स्वप्नवत कथेपेक्षा कमी नाही, जिथे परिस्थितीवर मात करून त्याने यशाचे शिखर गाठले आहे.
सनीचा परिवार गेली १५ वर्षे लोहगाव परिसरात एका झोपडीत वास्तव्यास आहे. सनीचे वडील सुभाष फुलमाळी नंदीबैल घेऊन भविष्य सांगतात, तर आई सुई-दाभण विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अशी परिस्थिती असतानाही सनीने हार मानली नाही. आजोबा आणि वडिलांनाही कुस्तीची आवड होती, पण आर्थिक अडचणींमुळे ती थांबवावी लागली. वडिलांचे स्वप्न होते की मुलांनी पैलवान व्हावे. त्यांनी आपल्या तिन्ही मुलांना (भैय्या, बादल आणि सनी) स्वतः प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. पैशांअभावी वडिलांनी झोपडीजवळच्या माळरानावर तात्पुरती मातीची तालीम उभारली आणि मुलांचा सराव सुरू केला. सध्या दहावीत शिकणाऱ्या सनीने महाराष्ट्र चॅम्पियनशिपमध्ये विजेतेपद आणि राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. आता आशियाई युवा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून त्याने देशाचा गौरव वाढवला आहे.
वस्ताद ठरले 'देवदूत'
सनीच्या जिद्दीला योग्य मार्गदर्शन मिळाले नसते, तर त्याचे स्वप्न अपुरे राहिले असते. रायबा तालीमचे वस्ताद पै. सोमनाथ मोझे आणि सदाशिव राखपसरे यांनी त्याला सुरुवातीला मार्गदर्शन केले. पुढे लोणीकंद येथील जाणता राजा तालीममध्ये वस्ताद संदीप भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली सनी परिपक्व झाला. वस्ताद भोंडवे यांनी सनीला दत्तक घेऊन त्याचा कुस्तीचा सर्व खर्च उचलला आणि त्याचे भविष्य घडवले.
ग्रामीण तरुणांना प्रेरणा
आमदार सुरेश धस यांनी सनीचे कौतुक करताना म्हटले, "अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळवणं ही मोठी कामगिरी आहे. सनीने आपल्या मेहनती, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आष्टीचं नाव उज्ज्वल केलं आहे. त्याचे यश ग्रामीण तरुणांना प्रेरणा देणारं आहे."