कानिफनाथ घाटात टायर घेऊन जाणारा ट्रक उलटला; आठवड्यातील दुसरी घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 19:25 IST2023-12-06T19:24:45+5:302023-12-06T19:25:16+5:30
सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

कानिफनाथ घाटात टायर घेऊन जाणारा ट्रक उलटला; आठवड्यातील दुसरी घटना
- नितीन कांबळे
कडा- कानिफनाथ घाटात पुन्हा एकदा एक ट्रक उलटल्याची घटना आज दुपारी तीन वाजेच्या दरम्यान घडली.या अपघातात मालवाहू ट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून चालक जखमी झाला आहे.
भिंवडी येथून मंगळवारी रात्री आठच्या दरम्यान अपोलो कंपनीचे टायर घेऊन ट्रक ( क्रमांक एम.एच ४६, बी.बी.९४७१ ) हैदराबादला चालला होता. बुधवारी दुपारी बीड-नगर राज्य महामार्गावरील आष्टी तालुक्यातील कानिफनाथ घाटात वळणाचा अंदाज न आल्याने चालकाचा ताबा सुटून ट्रक उलटला. नशिब बलवत्तर म्हणून चालक संतोष विश्वास खाडे ( रा.धनेगाव ता.देवणी.जि.लातुर) याचा जीव वाचला. चालक जखमी झाला असून ट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
आठवड्यातील दुसरी घटना
२६ नोव्हेंबर रोजी देखील एक ट्रक वळणाचा अंदाज न आल्याने उलटला होता. या अपघातमध्येही दोघेजण सुदैवाने वाचले होते. या घटनेला आठवडा होत नाही तोच ही दुसरी घटना घडली आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आता तरी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शिवा शेकडे यांनी केली आहे.