एका ट्रॅक्टर चोरीच्या तपासात, चार ट्रॅक्टरची चोरी झाली उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 18:39 IST2023-02-11T18:39:14+5:302023-02-11T18:39:55+5:30
लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील एकूण चार ट्रॅक्टरची चोरी करून ते भंगारात विकून नष्ट केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.

एका ट्रॅक्टर चोरीच्या तपासात, चार ट्रॅक्टरची चोरी झाली उघड
- मधुकर सिरसट
केज ( बीड) : तालुक्यातील कोरेगाव येथील ट्रॅक्टर चोरी प्रकरणी केज पोलिसांनी कळंब पोलिसांच्या ताब्यातील तीन आरोपी ताब्यात घेतले आहेत. चौकशीत कोरेगावच्या ट्रॅक्टर चोरीची तर कबूली दिलीच परंतु, दोन महिन्यात चार ट्रॅक्टर चोरल्याचेही आरोपींनी सांगितले. जिल्ह्यातील ट्रॅक्टर चोरीचे आणखीन ही गुन्हे उघड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कोरेगाव येथील अजमेर रसूल तांबोळी यांनी दि. 8 जानेवारी रोजी त्यांच्या मालकीचे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे लाल रंगाचे ट्रॅक्टर क्र. (एम एच -24 / डी - 4865 ) हे कोरेगाव येथील केज-बीड रस्त्या लगतच्या भाई- भाई वेल्डिंग वर्कशॉप समोर उभे केले होते. ते दि. 9 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजेच्या दरम्यान चोरीला गेले होते. याप्रकरणी अजमेर तांबोळी यांच्या तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गु. र. नं. 09/2023 भा. दं. वि. 379 नुसार गुन्हा दाखल झाला होता.
दरम्यान, उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ट्रॅक्टर चोरीच्या प्रकरणात विकास बापूराव भालेकर, (रा.तांदळवाडी जि.उस्मानाबाद), मुस्तफा नासेर सय्यद, (रा.कळंब ) आणि मोबीन मोहसीन सय्यद (रा. नेकनूर ) यांना पकडून कळंब पोलीसांच्या ताब्यात दिलेले होते. आरोपीची तेथील पोलीस कोठडी संपताच पोलीस नाईक दिलीप गित्ते, पोलीस नाईक देवकते आणि पोलीस नाईक महादेव बहिरवाळ यांच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. न्यायालयाने आरोपीस 13 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. चौकशीत चार जिल्ह्यातील चोरींच्या घटना उघडकीस झाल्या आहेत.
भंगारात विकले ट्रॅक्टर
लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील एकूण चार ट्रॅक्टरची चोरी करून ते भंगारात विकून नष्ट केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. दरम्यान, या प्रकरणात आरोपींच्या संख्येत वाढ होणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी दिली.
चार ट्रॅक्टरच्या चोरीची दिली कबुली
- एकूरगा, जि लातूर येथील शंकर श्रीरंग गाडे यांचे दि 15/11/2022 रोजी न्यू हॉलंड (एम एच-25 / ए एस-2019) हे ट्रॅक्टर चोरले होते. गुन्हा मुरुड पोलिसात नोंद.
- कळंब, जि उस्मानाबाद येथील अक्षय शंकर जावळे यांचे दि. 11/12/2022 रोजी सोनालिका छत्रपती ट्रॅक्टर (एम एच -25 / ए एच - 1969) चोरले होते. गुन्हा कळंब पोलिसात दाखल
- हावरगाव ता कळंब जि उस्मानाबाद येथील अण्णासाहेब भास्कर कोल्हे यांचे सोनालिका एम एच 25 / ए एस - 7260 हे ट्रॅक्टर दि. 5/1/2023 रोजी चोरले. गुन्हा कळंब पोलीसात दाखल
- कोरेगाव ता केज येथील अजमेर रसूल तांबोळी यांचे दि.दि. 8 जानेवारी रोजी त्यांच्या मालकीचे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे लाल रंगाचे ट्रॅक्टर क्र. (एम एच-24 / डी - 4865) हे चोरले.