भरधाव वेगातील अनियंत्रित कार बसवर धडकली; कारमधील चार मद्यधुंद प्रवासी गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 18:15 IST2025-04-12T18:15:25+5:302025-04-12T18:15:53+5:30
चालकाच्या प्रसंगावधानाने बस रस्त्याच्या बाजूच्या २० फुट खोल खड्ड्यात जाण्यापासून वाचून मोठा अनर्थ टळला.

भरधाव वेगातील अनियंत्रित कार बसवर धडकली; कारमधील चार मद्यधुंद प्रवासी गंभीर जखमी
- मधुकर सिरसट
केज ( बीड) : शेगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील केज तालुक्यातील माळेगाव शिवारात शनिवारी (दि. 12 ) पहाटे 2 वाजण्याच्या दरम्यान राज्य परिवहन मंडळाच्या बसवर भरधाव वेगातील अनियंत्रित कार धडकली. यात कार मधील चार मद्यधुंद प्रवासी गंभीर जखमी झाले असून बसमधील चार प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान, चालकाच्या प्रसंगावधानाने बस रस्त्याच्या बाजूच्या २० फुट खोल खड्ड्यात जाण्यापासून वाचून मोठा अनर्थ टळला.
हिंगोली आगाराची बस ( क्रमांक एमएच 14 बीटी 2529) 45 प्रवाशांना घेऊन कोल्हापूरहून हिंगोलीकडे निघाली होती. शनिवारी पहाटे दोन वाजेच्या दरम्यान माळेगाव बस थांब्या जवळील वळणावर तुळजापूर येथे देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची भरधाव कार ( क्र. एमएच 46 बीबी 1769) चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बसवर समोरून धडकली. यात कारमधील हनुमंत चिंतामण पांचाळ ( 28 वर्षे) सुधाकर भीमराव वाकूरे ( 30 वर्षे) विलास मधुकर वाघमारे (25 वर्षे), संतराम माधव जावडे (40 वर्षे, चौघेही रा शुक्लेश्वर निंबगाव ता माजलगाव) हे चौघेही गंभीर जखमी झाले आहेत. तर बसमधील चार प्रवाशीही किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. माहिती मिळताच युसूफवडगाव ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे, जमादार महादेव केदार व इतर कर्मचारी घटनास्थळी पोहचले.
माळेगावचे युवक मदतीला धावले
माळेगाव येथील युवक बळीराम लोकरे, कमलाकर गव्हाणे, दत्ता गव्हाणे, राम चिरके, ज्ञानेश्वरी गिरी यांनी अपघातस्थळी धाव घेऊन बसमधील प्रवाशांच्या मदतीने कारमध्ये अडकलेल्या चौघांना कारचा दरवाजा तोडून बाहेर काढले. त्यानंतर चारही जखमींना पुढील उपचारासाठी अंबाजोगाईच्या स्वराती रुग्णालयात पाठविण्यात आले.
बस चालकाच्या दक्षतेमुळे हानी टळली
कोल्हापूर येथून हिंगोलीकडे जाणारी बस माळेगाव बस थांब्याजवळ येताच समोरून येणारी कार बसवर धडकली. यावेळी बस चालकाने प्रसंगावधान राखून बसचा वेग नियंत्रित करण्यात यश मिळविले. अन्यथा बस 20 फूट खोल खड्ड्यात कोसळून मोठी दुर्घटना झाली असती. त्यामुळे बसमधील 44 प्रवासी बालंबाल बचावले.
कारमधील चौघेही मद्यधुंद
अपघातात कार चकनाचूर होऊन मोठे नुकसान झाले आहे. अपघात घडताच मदतीला धावलेल्या युवकांनी जखमीना नाव, गाव विचारले असता मद्यधुंद अवस्थेत असल्यामुळे कोणालाही नीट बोलता येत नव्हते, अशी माहिती मदतीला धावून आलेल्या युवकांनी लोकमतशी बोलताना दिली.