भरधाव वेगातील कार वळणावर उलटून अपघात; पतीचा मृत्यू, पत्नी आणि दोन मुले जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 11:46 IST2022-09-07T11:45:49+5:302022-09-07T11:46:01+5:30
सासुरवाडीवरून पत्नी आणि मुलांना घेऊन परत गावी येताना झाला अपघात

भरधाव वेगातील कार वळणावर उलटून अपघात; पतीचा मृत्यू, पत्नी आणि दोन मुले जखमी
कडा (बीड) : मंगळवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास पाटोदाजवळील एका वळणावर भरधाव वेगातील कारवरील ( एम.एच १४ डी.एक्स.१३०४ ) ताबा सुटल्याने अपघात झाला. यात पतीचा जागीच मृत्यू झाला असून पत्नी आणि दोन मुले जखमी झाले आहेत. किशोर निवृत्ती सापते ( ३२) असे मृताचे नाव आहे.
आष्टी तालुक्यातील बावी येथील किशोर निवृत्ती सापते हा पत्नी व दोन मुले यांना घेऊन सोमवारी लिंबागणेश येथे सासुरवाडीला गेला होता. एक दिवस मुक्काम करून मंगळवारी कारने सापते कुटुंब गावाकडे परतत होते. दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास पाटोदा येथील एका वळणावर भरधाव वेगातील कार उलटली. यात किशोर सापतेचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी मनिषा व दोन मुले जखमी झाले आहेत. कुटुंबातील एकुलता एक मुलगा अपघातात मयत झाल्याने सापते कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शोकाकुल वातावरणात किशोर सापतेवर बावी येथे मंगळवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.