ठाकरे गटाला धक्का, बीड जिल्हा समन्वयक बप्पासाहेब घुगे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात
By सोमनाथ खताळ | Updated: August 26, 2023 15:30 IST2023-08-26T15:29:53+5:302023-08-26T15:30:48+5:30
प्रवेशाची घोषणा करताच शिवसेनेतून करण्यात आली हकालपट्टी

ठाकरे गटाला धक्का, बीड जिल्हा समन्वयक बप्पासाहेब घुगे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात
बीड :शिवसेना (उबाठा) जिल्हा समन्वयक बप्पासाहेब घुगे यांनी राष्ट्रवादीतील अजित पवार गटात जाण्याची घोषणा शुक्रवारी केली. त्यानंतर शनिवारी लगेच त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तर घुगे अजित पवार गटात रविवारी प्रवेश करणार आहेत. हा ठाकरे गटाला धक्का आहे.
बप्पासाहेब घुगे मागील अनेक वर्षांपासून शिवसेनेत कार्यरत आहेत. मध्यंतरी त्यांची जिल्हाप्रमुख पदासाठीही चर्चा होती. अशातच त्यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला. याबाबत घुगे यांनीच शुक्रवारी रात्री उशिरा पत्रक काढून आपण अजित पवार गटात जाणार असल्याचे सांगितले. त्यानंतर शनिवारी सकाळी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी करत असल्याचे सांगितले. दरम्यान, आगोदरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे आमदार, खासदार, पदाधिकारी आपल्या बाजूने वळवले आहेत. त्यात आता अजित पवार गटानेही भर पाडली आहे. ठाकरे गटातील पदाधिकारी अजित पवार गटाकडून आपल्या पक्षात घेतले जात आहेत.