दसरा मेळाव्यासाठी खा.प्रितम मुंडे यांच्या नेतृत्वात होणार रॅली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2022 20:34 IST2022-10-03T20:34:14+5:302022-10-03T20:34:39+5:30
गोपीनाथगड ते भगवान भक्तीगड रॅलीतून दिसणार भक्ती आणि शक्तीचे भव्यदिव्य स्वरूप

दसरा मेळाव्यासाठी खा.प्रितम मुंडे यांच्या नेतृत्वात होणार रॅली
परळी: राष्ट्रसंत भगवान बाबा यांची जन्मभूमी भगवान भक्तीगड, सावरगाव घाट येथे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी गोपीनाथगड येथून अभूतपूर्व दसरा मेळावा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे, बीडच्या खासदार डॉ.प्रितम मुंडे यांच्या नेतृत्वात रॅली होणार असून मोठ्या संख्येने मुंडे प्रेमींचा सहभाग रॅलीत असणार आहे.
बुधवारी सकाळी सहा वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन रॅलीला सुरुवात होणार असून दरवर्षीप्रमाणे यंदाही गोपीनाथगड, सिरसाळा, दिंदृड, तेलगाव, वडवणी, घाटसावळी, बीड, वंजारवाडी मार्गे नायगाव, तांबवा राजुरी, चुंबळी फाटा, वांजरा फाटा, कुसळंब भगवान भक्तीगड सावरगाव घाट अशी रॅली निघणार आहे. खासदार प्रितमताई मुंडे यांच्या नेतृत्वात होणाऱ्या या रॅलीच्या माध्यमातून गोपीनाथगडाच्या भक्तीचे आणि भगवान बाबांच्या शक्तीचे भव्यदिव्य स्वरूप ‘याचि देही याचि डोळा' अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने लोकांचा सहभाग रॅलीत असणार आहे.