अनेकांना पडलेला प्रश्न; व्यसन नसतानाही का होतो आतड्याचा कॅन्सर, जाणून घ्या कारणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 13:47 IST2025-02-10T13:42:02+5:302025-02-10T13:47:26+5:30

बदललेली जीवनशैली, बदललेल्या खाण्याच्या सवयी, जंक फूडचे अधिक सेवन, व्यसन, व्यायामाचा अभाव व ताणतणावामुळे आतड्याच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.

A question that haunts many; Why does bowel cancer occur even without addiction, know the reasons | अनेकांना पडलेला प्रश्न; व्यसन नसतानाही का होतो आतड्याचा कॅन्सर, जाणून घ्या कारणे

अनेकांना पडलेला प्रश्न; व्यसन नसतानाही का होतो आतड्याचा कॅन्सर, जाणून घ्या कारणे

- अविनाश मुडेगांवकर
अंबाजोगाई :
चरबीयुक्त आहार, गुटखा, तंबाखू, धूम्रपान व दारूच्या व्यसनामुळे अन्ननलिकेच्या कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. शिवाय कोणतेही व्यसन नसताना दीर्घ कालावधीच्या ॲसिडीटीमुळेही हा आतड्याचा कॅन्सर होऊ शकतो. विशेष म्हणजे, या कॅन्सरमध्ये अन्ननलिका दोन ते तीन सेंटीमीटरपर्यंत अरुंद झाली, तरी विशेष असा त्रास जाणवत नाही. याकडे दुर्लक्ष होऊन तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यातच या आजाराचे निदान होते. साधारण ९० टक्के या कॅन्सरचे निदान उशिरा होत असल्याने मृत्यूचे प्रमाण अधिक आहे, त्यामुळे वेळीच काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

पस्तिशीतल्या तरुणांचे आतडे खराब :
- बदललेली जीवनशैली, बदललेल्या खाण्याच्या सवयी, जंक फूडचे अधिक सेवन, व्यसन, व्यायामाचा अभाव व ताणतणावामुळे आतड्याच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.
- विशेषतः साखर आणि मांसाहार अमर्यादित होत असल्याने पस्तिशीतल्या तरुणांचे आतडे खराब होत असल्याचे दिसून येत आहे.
- भारतात मोठ्या आतड्याच्या शेवटच्या भागातला म्हणजे गुदद्वाराचा कॅन्सर तरुणांमध्ये सर्वाधिक आढळून येतो.

कॅन्सरचे प्रकार किती?
दोनशेहून अधिक प्रकारचे कॅन्सर आहेत. मुख्यत्वे आढळणारे गर्भाशय, स्तन, अन्ननलिका, मूख, अडजिभेचा, रक्ताचा कॅन्सर आहेत.

आतड्याचा कॅन्सर झाला कसे ओळखणार?
पचनामध्ये समस्या असल्यास, जसे की वारंवार बद्धकोष्ठता किंवा वारंवार मलविसर्जन, मलमध्ये रक्त असल्यास किंवा त्याचा रंग काळा असल्यास, वारंवार पोटात दुखणे. वजन कमी होणे. थकवा जाणवणे. अती दारू पिल्याचा असाही परिणाम, अती दारू पिणं हे आतड्याच्या कॅन्सरचं एक मोठं कारण आहे. दारूमुळे आतड्यांमध्ये जळजळ होते आणि पेशींची वाढ अनियंत्रित होते, ज्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो.

आनुवंशिकता हेही कारण :
ज्यांना कोणतंही व्यसन नसतं, त्यांनाही आतड्याचा कॅन्सर होऊ शकतो. याचं कारण म्हणजे आनुवंशिकता, पर्यावरणीय घटक आणि जीवनशैलीतील बदल.

भारतात ४० ते ५० वयोगटात ‘रेक्टम’, म्हणजे गुदाशयात होणारा कर्करोग हा सर्वांत सामान्य आहे. या शिवाय, ५० ते ६० वयोगटात कोलन कॅन्सर हा मोठ्या आतड्यात होणारा कर्करोग दिसून येतो. याला कोलोरेक्टल कर्करोग असेही म्हणतात. कोलन कॅन्सर हा जीवघेणा आजार आहे. पॉलीपोसिस कॅन्सर हा दुर्मीळ असला, तरी यामागे आनुवंशिकतेसह इतरही काही कारणे असतात.
- डॉ. नितीन चाटे, सर्जरी विभाग प्रमुख, स्वा. रा. ती. रुग्णालय,अंबाजोगाई.

Web Title: A question that haunts many; Why does bowel cancer occur even without addiction, know the reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.