नऊ दिवस पाठलाग पण नातेवाईकांच्या सतर्कतेने मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न फसला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 18:21 IST2024-09-24T18:20:01+5:302024-09-24T18:21:42+5:30
नातेवाईकांनी सतर्कता दाखवत एकाला पकडून बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले

नऊ दिवस पाठलाग पण नातेवाईकांच्या सतर्कतेने मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न फसला
केज (जि. बीड): येथील भीमनगर भागात राहणाऱ्या अंकुर परमेश्वर मस्के (११) या शाळकरी मुलाचा नऊ दिवस पाठलाग केला. यानंतर दहाव्या दिवशी त्याचे अपहरण केले. परंतु, नातेवाईकांनी सतर्कता दाखवत एकाला पकडून बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले तर तिघांनी धूम ठोकली. या प्रकरणी मुलाच्या वडिलांच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध सोमवारी दुपारी गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी वाहनांसह इतर साहित्यही जप्त केले आहे.
अंकुर हा केज येथील एका शाळेत पाचवीच्या वर्गात शिक्षण घेतो. १४ सप्टेंबरपासून काही लोक त्याचा तो शाळेत जाताना पाठलाग करत होते. तुला चॉकलेट देतो म्हणून त्याला कधी दुचाकीवर तर कधी चारचाकी वाहनात बसण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती अंकुरने घरच्यांना दिली होती. त्यामुळे अंकुर हा शाळेत जाताना त्याचे नातेवाईक त्याच्यासोबत जात होते. दरम्यान, सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता तो शाळेत जाण्यासाठी घरून निघाला असता, त्याचे काही नातेवाईक त्याच्या पाठीमागून काही अंतरावरून चालत होते. अंकुरला मच्छीमार्केटच्या जवळ एक निळ्या रंगाची (एमएच १२, एचव्ही ७०९९) ही कार दिसली. याच कारमधून काहीजण येऊन मला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून गाडीत बस म्हणतात, असे अंकुरने सांगितले. एकजण त्याला पळवून नेण्याच्या बेतात असतानाच नातेवाईकांनी त्याला पकडून बेदम चोप दिला. नंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. अंकुरचे वडील परमेश्वर मस्के यांच्या फिर्यादीवरून धनराज वळसे (रा. केज), विजय गोपीनाथ भंडारी (रा. सासर इंदापूर, जि. पुणे) व इतर दोन अज्ञात आरोपींविरुद्ध केज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील हे करत आहेत.
तपोवनच्या मुलालाही कोंडून ठेवले
केज तालुक्यातील सारणी आनंदगाव येथील विश्वजित ज्ञानेश्वर हांडे हा रविवारी परळी तालुक्यातील तपोवन येथील शाळेत जातो म्हणून घरून गेला होता. तो तेथे पोहोचलाच नव्हता. दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या विश्वजित याला केज येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये चेहऱ्यावर गुंगीचा फवारा मारून कोंडून ठेवले होते. सोमवारी सकाळी तो शुद्धीवर आल्यानंतर १५ किलोमीटर चालत जात सारणी या आपल्या मूळगावी जाऊन त्याने सुटका करून घेतली. या गुन्ह्याशी याचा काही संबंध आहे का? याचा तपास करणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.