Beed: घोडा, मेंढीचा पाडला हिंस्र प्राण्याने पाडला फडशा; बिबट्याच्या शक्यतेने खळबळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 12:43 IST2025-12-15T12:41:58+5:302025-12-15T12:43:34+5:30
फुलसांगवी शिवारातील घटना: या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Beed: घोडा, मेंढीचा पाडला हिंस्र प्राण्याने पाडला फडशा; बिबट्याच्या शक्यतेने खळबळ!
शिरुर कासार : तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून बिबट्याच्या वावराची चर्चा असतानाच, शनिवारी रात्री या भीतीत भर घालणारी घटना घडली आहे. फुलसांगवी शिवारात अज्ञात हिंस्र प्राण्याने केलेल्या हल्ल्यात एक घोडा आणि एका मेंढीचा फडशा पाडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील मेंढपाळ नथु गोपणे हे गेल्या पंधरा दिवसांपासून आपल्या मेंढ्या घेऊन चारण्यासाठी शिरुर कासार तालुक्यात आलेले आहेत. सध्या त्यांनी फुलसांगवी शिवारातील सुभाष भुजंगराव ढाकणे यांच्या शेतात मुक्काम ठोकला आहे. शनिवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास गोपणे यांच्या तांड्यावर हिंस्र प्राण्याने अचानक हल्ला चढवला. यावेळी बांधावर बांधलेल्या चार-पाच घोड्यांपैकी एका घोड्यावर आणि एका मेंढीवर या प्राण्याने झडप घातली. आरडाओरड झाल्यानंतर सदर प्राणी अंधारात पसार झाला. हा हल्ला बिबट्यानेच केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
ऊस तोडणीमुळे वाढला वावर
वन्यजीव मानद सदस्य सिद्धार्थ सोनवणे यांनी सांगितले की, सध्या ऊस तोडणीचा हंगाम सुरू असल्याने बिबट्यांचा वावर मानवी वस्तीच्या जवळ वाढलेला दिसून येतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
शेतकऱ्यांची रब्बी हंगामात अडचण
सध्या रब्बी हंगाम जोरात सुरू असून, पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्री-अपरात्री शेतात जावे लागते. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेला बिबट्याचा वावर आणि आता प्रत्यक्ष प्राण्यांवर झालेला हल्ला यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देण्यासाठी बाहेर पडणे धोक्याचे ठरत असल्याने शेती कामांवर परिणाम होत आहे. तातडीने पिंजरा लावण्याची मागणी फुलसांगवी ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली आहे.
वनविभागाची भेट व आवाहन
सदरील घटनेची माहिती मिळताच वनपाल दादासाहेब जोशी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृत प्राण्यांचे पोस्टमार्टेम रिपोर्ट आल्यानंतरच हा हल्ला बिबट्याचा होता की अन्य हिंस्र प्राण्याचा, हे स्पष्ट होईल असे त्यांनी सांगितले. दरम्यान, वनविभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांनी शक्यतो रात्री एकटे बाहेर पडू नये. अत्यंत निकडीचे काम असल्यास सोबत बॅटरी, घुंगरू काठी आणि दोन-चार सोबती असावेत असे आवाहन वन अधिकाऱ्यांनी केले आहे.