आष्टीत चोरट्यांचा धुमाकूळ; शेतवस्तीवर भरदिवसा घरफोडी, रोकडसह दागिने लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 14:39 IST2022-07-29T14:35:54+5:302022-07-29T14:39:15+5:30
चोरट्यांनी १ लाख ५० हजार रोकड सह ७ तोळे दागिने केले लंपास

आष्टीत चोरट्यांचा धुमाकूळ; शेतवस्तीवर भरदिवसा घरफोडी, रोकडसह दागिने लंपास
आष्टी (बीड) : धामणगाव येथील मुळे वस्तीवर भरदिवसा घरफोडीची घटना घडली आहे. गुरुवारी दुपारी झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी १ लाख ५० हजार रोकड, ७ तोळे दागिने लंपास केले. माहिती मिळताच घटनास्थळाचा अंभोरा पोलिसांनी पंचनामा केला. अधिक तपासासाठी बीड येथील फिंगरप्रिंट पथकाने देखील काही नमुने घेतली आहेत.
तालुक्यात चोरट्यांनी धुमाकुळ घातला आहे. आता तर भरदुपारी घरफोडी करण्यापर्यंत चोरट्यांचे धाडस वाढले आहे. तालुक्यातील धामणगाव येथील मुळे वस्तीवरील आण्णा रामभाऊ मुळे शेतात काम असल्याने घरास कुलूप लावून गेले होते. ही संधी साधत चोरट्यांनी गुरुवारी दुपारी मुळे यांचे घरफोड फोडले. ७ तोळे दागिने आणि पाहुण्यांना घर बांधकामाला देण्यासाठी आणलेले १ लाख ५० हजार रुपये घेऊन चोरट्यांनी पोबारा केला.
माहिती मिळताच घटनास्थळी अंभोरा पोलिसांनी धाव घेतली. उपनिरीक्षक रवि देशमाने, पो. ह. केदार, तालवे यांनी पंचनामा केला. यावेळी सरपंच अमोल चौधरी, उपसरपंच विजय गाढवे उपस्थित होते. याबाबत अंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. भरदिवसा घरफोडीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.