वादळीवाऱ्यासह पावसात अडकलेल्या शेतकऱ्यावर वीज कोसळली, जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 16:13 IST2023-04-28T16:13:17+5:302023-04-28T16:13:48+5:30
आज दुपारी शेतकरी शेतात शेळ्या चारत असताना अचानक पावसाला सुरुवात झाली

वादळीवाऱ्यासह पावसात अडकलेल्या शेतकऱ्यावर वीज कोसळली, जागीच मृत्यू
- मधुकर सिरसट
केज ( बीड) : तालुक्यातील केळगाव शिवारात आज दुपारी (दि. २८) १२ वाजेच्या दरम्यान झालेल्या वादळी पावसात वीज अंगावर कोसळून एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. बिभीषण आण्णासाहेब घुले ( 50) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
शेतकरी बिभीषण आण्णासाहेब घुले हे आपल्या शेळ्या शेतात चारत होते. दुपारी 12 वाजता वातावरण बदलून मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस सुरु झाला. दरम्यान, अचानक घुले यांच्यावर वीज कोसळली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्च्यात पत्नी, 1 मुलगा, 3 मुली असा परिवार आहे. घटनास्थळी पोलीस नाईक राजू गुंजाळ यांनी भेट दिली असून पंचनामा करून पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी केज येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
तसेच गुरुवारी मध्यरात्री 1 वाजेच्या दरम्यान झालेल्या अवकाळी पावसात काळेगावघाट शिवारात महालिंग शिवलिंग तांगडे यांच्या शेतातील गोठ्यावर वीज कोसळून एक बैल ठार झाला आहे, तर एक बैल होरपळला. तलाठी सोनुने आणि पशुधन विकास अधिकारी डॉ दीक्षांत जोगदंड आणि पशुधन पर्यव्यक्षक यादव यांनी घटनास्थळी भेट देऊन मयत बैलाची उत्तरीय तपासणी करून पंचनामा केला आहे.