कोळपणी करताना ताणतारेचा स्पर्श झाल्याने विजेच्या धक्क्याने शेतकऱ्यासह बैलजोडीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2024 14:00 IST2024-07-01T13:56:25+5:302024-07-01T14:00:54+5:30
शेतकरी कुटुंबावर दु:खाचा डोंगर; ताणतारेत विद्युत पुरवठा उतरून झाली दुर्घटना

कोळपणी करताना ताणतारेचा स्पर्श झाल्याने विजेच्या धक्क्याने शेतकऱ्यासह बैलजोडीचा मृत्यू
- संतोष स्वामी
दिंद्रुड (बीड) : शेतीत कोळपत असताना विजेचा तीव्र धक्का बसल्याने एक शेतकरी व दोन बैल ठार झाल्याची घटना आज, सोमवारी १ जुलै रोजी दुपारी बारा वाजेदरम्यान माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड शिवारात घडली. बालासाहेब बाबासाहेब डापकर (४०. रा.संगम ता. धारूर) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
संगम येथील शेतकरी बालासाहेब बाबासाहेब डापकर हे दिंद्रुड शिवारातील शेतात आज सकाळी कामासाठी गेले होते. सकाळी ११ वाजे दरम्यान कोळपणी करत असताना औताच्या लोखंडी कोळप्याचा शेतातील खांबाच्या ताणतारेला स्पर्श झाल्याने विजेचा तीव्र धक्का बसून शेतकरी बालासाहेब डापकर आणि दोन्ही बैलांचा मृत्यू जागीच मृत्यू झाला. तर शेतकरी डापकर यांच्यासोबत असलेले दोन सालगडी विजेच्या धक्क्याने दूर फेकले गेले.
ताण तारेला असलेली चिमणी फुटलेली दिसत आहे. त्यामुळे वीज ताणतारे उतरून ही दुर्घटना घडून शेतकऱ्याचा मृत्यू महावितरणच्या निष्काळजीपणाने झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. दरम्यान, धारूर तालुक्यात पंधरवड्यातील ही दुसरी घटना आहे. १५ जून रोजी शिंगणवाडी येथील तरुण शेतकरी देखील तान तारेला स्पर्श झाल्याने दगावल्याची घटना घडली होती.