परळीत पंगतीतील वाद रस्त्यावर आला; तरुणास अमानुष मारहाण, सात जण पोलिसांच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 11:40 IST2025-05-17T11:40:00+5:302025-05-17T11:40:56+5:30
चार जणांना अटक केली असून तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे

परळीत पंगतीतील वाद रस्त्यावर आला; तरुणास अमानुष मारहाण, सात जण पोलिसांच्या ताब्यात
परळी: तालुक्यातील लिंबूटा येथील युवक शिवराज नारायण दिवटे याला थर्मल रोडवरून टोळक्याने मोटरसायकलवर बसवून टोकवाडीच्या माळावर नेऊन बेदम मारहाण केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी आज, शनिवारी सकाळी तातडीने कारवाई करत चार जणांना अटक केली असून तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. अपहरण आणि मारहाणीची ही घटना शुक्रवार, १६ मे रोजी दुपारी ३.३० वाजता घडली होती.
या प्रकरणी शिवराज दिवटे याच्या फिर्यादीवरून परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात शनिवारी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. जलालपूर येथील एका मंदिरात पाहुण्यांच्या पंगतीसाठी गेले असता, जेवण करून परतताना थर्मल रोडवर पेट्रोल पंपाजवळ चार मोटरसायकलस्वारांनी शिवराजची वाट अडवली. त्यानंतर त्याला जबरदस्तीने टोकवाडी रस्त्यावरील माळावर नेण्यात आले. येथे टोळक्याने लोखंडी रॉड, कत्ती, बेल्ट आणि लाकडी काठ्यांनी शिवराजला बेदम मारहाण केली. शिवराजच्या जबाबानुसार, सकाळी जेवणाच्या ठिकाणी काही तरुणांमध्ये वाद झाला होता आणि त्यावेळी तो उपस्थित होता. याच वादातून हे प्रकरण उफाळल्याचे त्याने तक्रारीत नमूद केले आहे.
परळीत पंगतीतील वाद रस्त्यावर, टोळक्याचे तरूणावर काठ्या, कत्तीचे वार #beedcrime#marathwadapic.twitter.com/TJ8XNDtLJc
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) May 17, 2025
आरोपींमध्ये तीन अल्पवयीन
दरम्यान, बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे यांच्या नेतृत्वात या प्रकरणात तातडीने तपास करून कारवाई करण्यात आली. सध्या चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून तीन अल्पवयीन आरोपी बालन्याय मंडळाच्या देखरेखीखाली आहेत. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान, गंभीर दुखापत झालेल्या शिवराज दिवटेवर अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.