बालविवाह प्रकरणी नवरदेव, नवरीचे आई-वडील, भटजीसह ८ जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2023 18:50 IST2023-06-14T18:49:38+5:302023-06-14T18:50:13+5:30
या प्रकरणी ग्रामसेवकाच्या तक्रारीवरून ८ जणांवर गुन्हा दाखल

बालविवाह प्रकरणी नवरदेव, नवरीचे आई-वडील, भटजीसह ८ जणांवर गुन्हा दाखल
माजलगाव: बालकल्याण समिती परभणी आणि पंचायत समिती निमगाव यांच्या व्हाटसअॅपद्वारे बीड टीम मेंबर चाईल्ड हेल्पलाईनला आलेल्या माहितीवरुन माजलगाव तालुक्यातील गंगामसला येथील आठ जणांविरोधात बालविवाह केल्याप्रकरणी माजलगांव पोलीसांत गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी ग्रामसेवकांनी फिर्याद दिली.
माजलगाव तालुक्यातील गंगामसला येथे ७ मे २०२३ रोजी मोरेश्वर मंदीरात दुपारी दीड वाजता परभणी जिल्हयातील ंनिमगांव येथील अल्पवयीन मुलगी आणि गंगामसला येथील गणेश खंडेराया पारडे वय २४ वर्षे यांचा विवाह झाला. त्या अनुशंगाने परभणी येथील बालकल्याण समिती आणि पंचायत समिती निमगांव यांनी चाईल्ड हेल्पलाईनच्या टीममेंबरला १०९८ या क्रमांकावर माहिती कळवून सदरील माहिती ही माजलगाव पंचायत समितीला कळविण्यात आली.
त्यानंतर या माहितीवरुन सोहळयास उपस्थित असणारे नवरा मुलगा गणेश खंडेराया पारडे, खंडेराया ज्ञानोबा पारडे (मुलाचा वडील ), रुक्मीनी खंडेराया पारडे (मुलाची आई )सर्व रा. गंगामसला, कडाजी नारायण चौरे ( मुलाचा मामा), शिवकन्या कडाजी चौरे (मुलाची मामी रा. कासारी बोडखा) , सिध्देश्वर उर्फ बाळु हरिभाउ काळे ( मुलीचे वडील), निर्मला सिध्देश्वर काळे (मुलीची आई रा. निमगांव ता. सोनपेठ ) व रामदेव जोशी (भटजी ) रा. माजलगांव अशा आठ लोकांसह सोहळयास उपस्थित इतर लोकांवर माजलगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.