बीडमध्ये ४१ लाखांचा गांजा नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 23:26 IST2018-03-20T23:26:00+5:302018-03-20T23:26:00+5:30
दोन महिन्यांपूर्वी बीड तालुक्यातील मांजरसुंबा येथे स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून पकडलेला ४१ लाख ३७ हजार रुपये किंमतीचा ६ क्विंटल ८९ किलो गांजा न्यायालयाच्या आदेशानुसार मंगळवारी नष्ट करण्यात आला. यातील ट्रक व एक आरोपी अद्याप पोलिसांच्या ताब्यात आहे.

बीडमध्ये ४१ लाखांचा गांजा नष्ट
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : दोन महिन्यांपूर्वी बीड तालुक्यातील मांजरसुंबा येथे स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून पकडलेला ४१ लाख ३७ हजार रुपये किंमतीचा ६ क्विंटल ८९ किलो गांजा न्यायालयाच्या आदेशानुसार मंगळवारी नष्ट करण्यात आला. यातील ट्रक व एक आरोपी अद्याप पोलिसांच्या ताब्यात आहे.
हैदराबादहून बीडकडे एका १० टायरच्या ट्रकमधून (एपी १६ टीवाय १२०६) गांजा येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांना मिळाली. त्यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांना आदेश देत सापळा लावण्यास सांगितले. त्याप्रमाणे मांजरसुंबा गावात सापळा लावला. एका हॉटेलवर ट्रक थांबताच पोलिसांनी तपासणी केली असता ट्रकच्या खाली व टायरच्या बाजूला ६८९ किलो गांजा असल्याचे समजले. पोलिसांनी ट्रकसह एका आरोपीला ताब्यात घेतले होते. याचा तपास गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर यांच्याकडे होता.
दरम्यान, मंगळवारी पोलीस मुख्यालयावर हा गांजा नष्ट करण्यात आला. यावेळी अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक सुधीर खिरडकर, पोनि घनश्याम पाळवदे, सपोनि दिलीप तेजनकर, गणेश मुंढे यांच्यासह गुन्हे शाखा, नेकनूर ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते.