३७६ लाडक्या बहिणींच्या हातात कोयता अन् पोटात बाळ; बीड जिल्ह्यातील मजूर महिला अधिक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 14:17 IST2025-02-05T14:16:26+5:302025-02-05T14:17:20+5:30
पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यात बीडच्या ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी

३७६ लाडक्या बहिणींच्या हातात कोयता अन् पोटात बाळ; बीड जिल्ह्यातील मजूर महिला अधिक
- सोमनाथ खताळ
बीड : बीडचे लाखो मजूर सहा महिन्यांसाठी घर सोडून राज्यासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरातमध्ये ऊसतोडणीसाठी जातात. त्यांची आरोग्य तपासणी केली असता त्यात ३७६ महिला या गर्भवती असल्याचे समोर आले. पोटात बाळ असतानाही या लाडक्या बहिणी हातात कधी कोयता तर कधी डोक्यावर ऊसाची मोळी घेऊन पहाटेपासून कष्ट करत आहेत.
पुणे, सोलापूर, सातारा या जिल्ह्यांतील जवळपास ६५ साखर कारखान्यांवर बीडचे ऊसतोड मजूर जातात. यासह शेजारील जालना, लातूर, परभणी जिल्ह्यांतील मजुरांचाही समावेश असतो. सहा महिने घर सोडून उघड्या मैदानावर, माळरानावर खोपी करून त्यांना राहावे लागते. आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात. हाच धागा पकडून आरोग्य विभाग, पुणे मंडळामार्फत या मजुरांसाठी विशेष आरोग्य शिबिरे घेण्यात येतात. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शुक्रवारी उसाच्या फडात, खोपीवर जाऊन तपासणी केली जाते. बीडचे भूमिपुत्र तथा पुण्याचे उपसंचालक डॉ.आर.बी.पवार यांच्याकडून हा उपक्रम राबविला जात आहे.
ऊसतोड मजुरांसाठी या सुविधा:
गरोदर मातांची तपासणी व लसीकरण
पाच वर्षांखालील बालकांचे लसीकरण
बालकांच्या आजाराची तपासणी व उपचार
क्षयरोग, कुष्ठरोग आदी आजारांची तपासणी व संदर्भ सेवा
उच्च रक्तदाब अथवा मधुमेहाचे रुग्ण शोधून उपचार करणे
मुखाच्या कर्करोगाचे संशयित रुग्ण
स्तनाच्या व गर्भाशयाच्या कर्करोगाचे संशयित रुग्ण शोधून तपासण्या व उपचार करणे
जास्त मजूर हे बीड येथील
ऊसतोड मजुरांच्या तपासणीसाठी आरोग्य शिबिरे घेतली जातात. यात गरोदर माता, लहान मुलांची तपासणी करून आजारानुसार उपचार केले जातात. जास्तीत जास्त मजूर हे बीड जिल्ह्यातील आहेत.
- डॉ.आर.बी.पवार, उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे
अशी आहे आकडेवारी
आरोग्य शिबिरे - १२८
तपासलेले लाभार्थी - १३,९७७
तपासलेली बालके - २,१००
लसीकरण केलेली बालके - १,०४४
गरोदर माता - ३७६
संशयित क्षयरुग्ण - ४
संशयित कुष्ठरुग्ण - ८१
मुख कर्करोग रुग्ण - ४
मोतिबिंदू रुग्ण - २१
रेफर केलेले रुग्ण - ८९