राक्षसभुवनच्या लढाईला २६२ वर्षे झाली; निजामाविरुद्ध मराठ्यांच्या ऐतिहासिक विजयाच्या पाऊलखुणा बुजू लागल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 09:17 IST2025-08-11T09:17:20+5:302025-08-11T09:17:37+5:30

मराठ्यांच्या ऐतिहासिक विजयाच्या पाऊलखुणाच बुजत चालल्या आहेत.

262 years Complete victory of Rakshas Bhuvan in the historic battle between the Marathas and the Nizam | राक्षसभुवनच्या लढाईला २६२ वर्षे झाली; निजामाविरुद्ध मराठ्यांच्या ऐतिहासिक विजयाच्या पाऊलखुणा बुजू लागल्या

राक्षसभुवनच्या लढाईला २६२ वर्षे झाली; निजामाविरुद्ध मराठ्यांच्या ऐतिहासिक विजयाच्या पाऊलखुणा बुजू लागल्या

दिनेश लिंबेकर 

बीड: पानिपतच्या पराभवानंतर मराठे संपले असे समजले जात असताना केवळ अडीच वर्षांनी राक्षसभुवनला मराठे विरुद्ध निजाम या ऐतिहासिक लढाईत पेशव्यांचा विजय झाला. मराठी फौजेत नवा विश्वास संचारणाऱ्या त्या लढाईला २६२ वर्षे पूर्ण झालीत. परंतु, आजतागायत युद्धभूमीत वस्तू, शस्त्रे, अवशेष शोधण्यासाठीचे साधे उत्खनन होऊ शकले नाही. या गावात लढाईची माहिती देणारी साधी पाटीसुद्धा नाही. मराठ्यांच्या ऐतिहासिक विजयाच्या पाऊलखुणाच बुजत चालल्या आहेत.

पुण्यातील जाळपोळीचा बदला घेतला

१४ जानेवारी १७६१ च्या पानिपतच्या लढाईनंतर मराठे संपले, असा समज दक्षिणेतील निजाम, हैदरअलीसह शत्रूना झाला होता. त्यानंतरच्या दुहीचा फायदा घेऊन निजामांनी अनेक मराठा सरदार आपल्या बाजूला घेत पुण्यावर आक्रमण करत जाळपोळ, नासधूस, मंदिरांचा विध्वंस केला होता. ही बाब मराठा सरदारांनाच खटकल्याने थोरले माधवराव पेशव्यांच्या नेतृत्वाखाली मल्हारराव होळकरांनी मराठी सरदारांची घरवापसी केली.

पुण्यातील विध्वंसाचा बदला घेण्यासाठी युद्धाची रणनीती आखली. पुण्यातील जाळपोळीनंतर धारूरमार्गे निजाम औरंगाबादला जात असल्याची खबर पेशव्यांना कळाली. सोनारी मार्गे पेशवे लिंबागणेशला मुक्कामी येऊन पुढे ससैन्य धोंडराईला पोहोचले. निजाम गोदावरी पार करत असताना त्याला पेशव्यांनी रातोरात राक्षसभुवनला गाठले.

भल्या पहाटे निजामावर हल्ला, मराठ्यांची बाजी

१० ऑगस्ट १७६३ च्या भल्या पहाटे मराठा सरदारांनी निजामांच्या फौजांवर हल्ला चढवला. घाबरलेल्या निजामाने गोदावरीच्या पुरातून शहागड गाठले. मराठ्यांनी निजाम फौजांना गोदावरीच्या ऐल तीरावर गाठले. 

दिवसभराच्या लढाईत मराठी सरदार मानसिंग राजपूत, देवजी नारायण, महादजी निंबाळकर, खेळोजीराव पाटणकर यांना वीरमरण झाले, तर निजामाचा दिवान विठ्ठल सुंदर हा मारला गेला. थोरले माधवराव पेशवे हे हाती तलवार घेऊन रणांगणावर लढले.

लढाईनंतर गावातील समाधी, मोडी भाषेतील शिलालेख, युद्धभूमी या ठिकाणचे संशोधन होण्याची गरज आहे -संदीप लिंगरस, ग्रामस्थ

Web Title: 262 years Complete victory of Rakshas Bhuvan in the historic battle between the Marathas and the Nizam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.