सोलापूरातील २०१६ सालच्या चोरीचे धागेदोरे माजलगावपर्यंत; पोलिसांनी सराफाला घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 20:44 IST2023-01-18T20:42:59+5:302023-01-18T20:44:58+5:30
सोलापूर येथे 2016 साली एक घरफोडी झाली होती. या घरफोडीत 35 तोळे सोने चोरट्यांनी लंपास केले होते.

सोलापूरातील २०१६ सालच्या चोरीचे धागेदोरे माजलगावपर्यंत; पोलिसांनी सराफाला घेतले ताब्यात
माजलगाव (बीड) : सोलापुर शहरात 2016 साली एक घरफोडी होऊन त्यामध्ये 35 तोळे सोन्याची चोरी झाली होती. त्याचा तपास घेत पोलीस माजलगाव दाखल होऊन येथील दोघांना सोलापूर पोलिसांनी मंगळवारी रात्री 9 वाजता ताब्यात घेतल्याने शहरात खळबळ उडाली.
सोलापूर येथे 2016 साली एक घरफोडी झाली होती. या घरफोडीत 35 तोळे सोने चोरट्यांनी लंपास केले होते. या घटनेचा तपास सोलापूर क्राईम ब्रँचकडे देण्यात आला होता. क्राईम ब्रँचने या प्रकरणाचा तपास करत तब्बल सहा वर्षानंतर उस्मानाबाद येथील शशिकांत रापसे या आरोपीस ताब्यात घेतले. त्यानंतर या आरोपीने माजलगाव येथील अशोक भागवत या मेव्हण्याला चोरीचे सोने दिल्याचे कबूल केले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
यानंतर अशोक भागवत यांनी माजलगाव शहरातील गजानन उर्फ रिंकू बोकन या सराफा व्यापाऱ्यास 32 तोळे सोने विकल्याचे सोलापूर क्राईम ब्रँच अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यानंतर मंगळवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास सोलापूर क्राईम ब्रँचचे अधिकारी माजलगावात दाखल झाले. काही वेळातच पोलीसांनी गजानन बोकनची चौकशी करून त्यास ताब्यात घेऊन सोलापूरला घेऊन गेले. दरम्यान, सराफा गजानन बोकण यास सोलापूर न्यायालयात हजर केले असता त्यास 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या घटनेने माजलगाव शहरातील सराफा व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.