आठवले गँगकडून १६ गोळ्या फायर; पण गावठी कट्टा कुठेय? तिघे अटकेत, दोघे मोकाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 12:32 IST2024-12-24T12:32:34+5:302024-12-24T12:32:44+5:30
सनी आठवले मोकाट : अक्षयसह तिघांना तीन दिवसांची वाढीव पोलिस कोठडी

आठवले गँगकडून १६ गोळ्या फायर; पण गावठी कट्टा कुठेय? तिघे अटकेत, दोघे मोकाट
बीड : शहरातील बार्शी नाका परिसरात एकाचवेळी तब्बल १६ गाेळ्या फायर करणाऱ्या आठवले गँगमधील तिघांना अटक करण्यात आलेली आहे. परंतु अजूनही कुख्यात सनी आठवले माेकाटच आहे. तर तिघांना तीन दिवसांची वाढीव पोलिस कोठडी मिळाली आहे. असे असले तरी ज्या गावठी कट्ट्यातून गोळ्या फायर करण्यात आल्या, तो कट्टा कुठे आहे? याचा शोध स्थानिक गुन्हे शाखेला लागलेला नाही. तसेच फरार आरोपी शोधण्यातही अपयश आले आहे.
१३ डिसेंबर रोजी पहाटे २ वाजता बीड शहरातील बार्शी नाका परिसरातील प्रकाश आंबेडकर नगर भागात आठवले गँगने गोळीबार केला होता. यात विश्वास दादाराव डोंगरे हे जखमी झाले होते. याप्रकरणी आठवले गँगमधील अक्षय आठवले, सनी आठवले, आशिष आठवले या तिघा भावांसह मनीष क्षीरसागर, ओमकार पवार आणि प्रसार धिवार यांच्याविरोधात पेठबीड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यात अक्षय आठवले, मनीष क्षीरसागर आणि ओमकार सवाई अशा तिघांना अटक करण्यात आली. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून तपास एलसीबीकडे सोपविण्यात आला. अटक आरोपींची पहिली पोलिस कोठडी सोमवारी संपली. त्यानंतर पुन्हा हजर केले असता आणखी तीन दिवसांची वाढीव कोठडी मिळाली आहे.
आठवले बंधू कधी शोधणार?
याच प्रकरणातील सनी आठवले आणि आशिष आठवले हे दोघे भाऊ मोकाटच आहेत. सनी हा कुख्यात आहे. अनेकदा पहिले एक-दोन आरोपी पकडले की इतर आरोपींना पकडण्यासाठी थोडे दुर्लक्ष केले जाते. परंतु या प्रकरणातही असेच झाले तर हे कुख्यात आराेपी पुन्हा गुन्हा करण्याची शक्यता आहे. यापूर्वीही या गँगवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
भांडणातील हत्यार, शस्त्रे कुठेत?
या भांडणात गावठी कट्ट्यासह इतर हत्यार वापरल्याची शक्यता आहे. पोलिसांनी आतापर्यंत तीन आरोपी पकडले. त्यांना पोलिस कोठडीतही ठेवले, परंतु त्यांच्याकडून तपासात काय हाती लागले? याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक उस्मान शेख यांनी दिली नाही. तपासात काही गती मिळाली का किंवा काही शस्त्रे जप्त केली का? असे विचारताच तो तपासाचा भाग आहे, असे म्हणून जप्तीबाबत माहिती देणे टाळले.
अटक असलेल्या तीन आरोपींना आणखी तीन दिवसांची वाढीव पोलिस कोठडी मिळाली आहे. जप्त केल्याची माहिती देता येत नाही, तो तपासाचा भाग आहे.- उस्मान शेख, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा बीड