परळीतील धम्म केंद्रासाठी १५.५१ कोटी, तर बर्दापूरच्या डॉ. आंबेडकरांच्या स्मारकासाठी १.३२ कोटी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:00 IST2021-03-13T05:00:28+5:302021-03-13T05:00:28+5:30
परळी : राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या परळी मतदारसंघातील आंबेडकरी अनुयायांना दिलेला ‘शब्द’ ...

परळीतील धम्म केंद्रासाठी १५.५१ कोटी, तर बर्दापूरच्या डॉ. आंबेडकरांच्या स्मारकासाठी १.३२ कोटी मंजूर
परळी : राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या परळी मतदारसंघातील आंबेडकरी अनुयायांना दिलेला ‘शब्द’ पाळत शहरातील प्रभाग क्र. ३ मधील नगरपरिषदेच्या जागेत बौद्ध धम्म केंद्र विकसित करण्यासाठी १५ कोटी ५१ लाख रुपयांचा निधी तसेच मतदारसंघातील बर्दापूर (ता. अंबाजोगाई) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारक उभारणीसाठी १ कोटी ३२ लाख रुपयांचा निधी सामाजिक न्याय विभागामार्फत मंजूर केला आहे. भविष्यातही विकासकामांच्या बाबतीत मतदारसंघात निधीची कमतरता भासू देणार नाही, तुम्ही मागाल ते मी पुरविणार, असे यावेळी धनंजय मुंडे म्हणाले.
परळीतील आंबेडकरी अनुयायांनी १२ मार्चल परळी येथील शासकीय विश्रामगृहात धनंजय मुंडे यांचा फेटा बांधून सत्कार करून त्यांचे व सामाजिक न्याय विभागाचे आभार मानले. यावेळी नगरपरिषद गटनेते वाल्मिक कराड, प्रा. डॉ. विनोद जगतकर, माधव ताटे, सोपान ताटे, महादेव रोडे, अनंत इंगळे, महेंद्र रोडे, नितीन रोडे, भैयासाहेब आदोडे, आबासाहेब आदोडे आदी बौद्धबांधव उपस्थित होते.
बीडच्या विश्रामगृहाचे नूतनीकरण
नव्या अर्थसंकल्पाच्या रूपाने धनंजय मुंडे यांनी जिल्ह्याच्या विकासकामांना गती दिली आहे. बीड शहरातील व्हीव्हीआयपी विश्रामगृहाच्या नूतनीकरणाच्या ७.२६ कोटी रुपयांच्या आराखड्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे तसेच आष्टी तालुका न्यायालयाच्या इमारत बांधकामाच्या ७.१२ कोटी रुपयांच्या आराखड्यासही प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. अर्थसंकल्पाचे सूप वाजताच मुंडे यांनी जिल्ह्यातील रखडलेले प्रकल्प पूर्णत्वास नेणे व पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर भर दिला आहे. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी बीडच्या शासकीय विश्रामगृहाच्या नूतनीकरणासंदर्भात मागणी केली होती. आष्टीचे आ. बाळासाहेब आजबे यांनी आष्टी येथील न्यायालयास नवीन इमारत बांधण्याबाबत मागणी केली होती.