'ही' आहेत केसगळतीची मुख्य कारणं; जाणून घ्या त्यावरील उपाय
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 17:13 IST2019-10-16T17:02:40+5:302019-10-16T17:13:39+5:30
आजच एका येऊ घातलेल्या हिंदी चित्रपटाचं नाव 'उजडा चमन' आहे असं वाचलं. उत्सुकता निर्माण झाली म्हणून आणखी शोधाशोध केली तर कळलं की, या चित्रपटातील हिरोची गोष्ट अकाली टक्कल पडण्याच्या समस्येवर आधारित आहे.

'ही' आहेत केसगळतीची मुख्य कारणं; जाणून घ्या त्यावरील उपाय
- डॉ नेहा पाटणकर
आजच एका येऊ घातलेल्या हिंदी चित्रपटाचं नाव 'उजडा चमन' आहे असं वाचलं. उत्सुकता निर्माण झाली म्हणून आणखी शोधाशोध केली तर कळलं की, या चित्रपटातील हिरोची गोष्ट अकाली टक्कल पडण्याच्या समस्येवर आधारित आहे. म्हणजेच आजच्या युगातला हा किती जिव्हाळ्याचा विषय आहे हेच अधोरेखीत होतंय. पूर्वी केसांची जोपासना करणे, त्यांची नीट काळजी घेणे हे स्त्रियांच्या अखत्यारीत येत होतं. लांब केस असणं एक सौंदर्याचं लक्षण मानले जात असे. त्यामुळे केस गळतात का? असं विचारलं की, अत्यंत काळजीयुक्त स्वरात 90 टक्के स्त्रिया "हो" असंच उत्तर देताना दिसतात.
खरं तर आपल्या स्काल्प वर असलेल्या 1 लाख हेअर फॉलिकल्स पैकी 50 ते 100 केसांची दररोज गळती होणे हे अगदी नॉर्मलच असते. असे अमेरिकन असोसिएशन ऑफ डर्मटोलॉजिस्ट यांचं म्हणणं आहे. डोक्याचे केस गळणं किंवा अकाली टक्कल पडणं हे बरचसं अनुवांशिक असतं. पण हल्ली अगदी तिशी, चाळिशीतच टक्कल पडणे, खूप केस गळणे, पातळ होणे हे अकाली वार्धक्याचंही लक्षण असू शकतं. हल्ली तिशी किंवा चाळीशीत antidepressants, हाय बीपी साठी औषधं, हाय यूरिक अॅसिड औषधं हे घेण्याचं प्रमाणही वाढलं आहे. या औषधांचा साईड इफेक्ट म्हणूनसुद्धा केस गळू शकतात. मुख्यत्वे स्त्रियांमध्ये गर्भनिरोधक गोळ्या, पिंपल्ससाठी घेण्यात येणाऱ्या औषधांमधील हाय व्हिटॅमिन ए हेसुद्धा केस गळतीचे कारण असू शकतं.
अचानक सुरू झालेली केस गळती ही खूप मोठ्या आजारपणानंतर चालू होऊ शकते. आजकाल पटकन वजन कमी करण्यासाठीचे डाएटस करण्याच्या प्रथेनुसार म्हणजेच, अमक्या तमक्या समारंभासाठी बारीक दिसायचं आहे. हे तर खूपच सामान्य झालं आहे. कुठलाही क्रॉनिक स्ट्रेस किंवा मानसिक धक्का हे अचानक केस गळतीचं कारण ठरतं. हिमोग्लोबिनची कमतरता, आहारातील प्रोटीनचे कमी प्रमाण, थायरॉइड हार्मोन्सची कमी किंवा जास्त प्रमाण असेल तर, त्यामुळे नक्की केस गळतात, विरळ होतात.
आजच्या युगातल्या PCOD चं मुख्य लक्षण केस गळणे, अकाली टक्कल पडणे हेच असतं. डोक्याच्या त्वचेला झालेल्या काही फंगल इन्फेक्शनमुळे केसांची गळती वाढते. केमिकलयुक्त शॅम्पू औषधांच्या दुकानात सर्रास उपलब्ध असतात. परंतु खूप जास्त त्रास असेल तर मात्र skin specialist चा सल्ला नक्की घ्यायला हवा. कॅल्शिअम, मॅग्नेशियम, बायोटिन, झिंक, व्हिटॅमिन बी 12 ही व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स केसांच्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत. आयर्नच्या कमतरतेमुळे कमी होणारे हिमोग्लोबिन केसांचे पुरेसे पोषण करत नाही. भारतामध्ये हे एक केस गळण्याचं मुख्य कारण आहे.
आहारामध्ये हिरव्या भाज्या, पालेभाज्या आणि प्रोटिन्स असलेला संतुलित आहार घेणं गरजेचं आहे.
केस किती गळणार, टक्कल किती पडणार हे जरी काही अंशी अनुवंशिकता ठरवत असेल तरी आपणही काही गोष्टी केल्यामुळे आणि काही गोष्टी न केल्यामुळे ही समस्या आपल्यावर ओढवून घेत असतो. म्हणूनच पोषक आहाराने शरीराची काळजी घेणे आणि मेडीटेशन/योगा करून मनाची काळजी घेणे हे केसांचं आरोग्य राखण्यासाठी महत्त्वाचं ठरतं.
केसांची निगा राखण्यासाठी पाळण्याची पथ्य -
1) केस खूप जोरात विंचरल्याने केसांच्या मुळांना दुखापत होऊ शकते.
2) केसांना खूप शॅम्पू लावणे टाळावे.
3) केस ओले असताना खसखसून पुसू नयेत.
4) हेअर स्प्रे, हेअर ड्रायर यांचा कमीत कमी वापर करणे.
5) केसांना वेगवेगळे रंग चढवणे हानिकारकच.
6) केस खूप घट्ट बांधून ठेवण्याने केसांवर ताण येतो