दुभंगलेल्या केसांची समस्या दूर करण्यासाठी करा 'हे' उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2018 15:47 IST2018-08-11T15:47:23+5:302018-08-11T15:47:38+5:30
बदललेली लाइफस्टाइल आणि हवामानातील वाढलेलं प्रदुषण यांमुळे केसांच्या अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यामध्ये केस पांढरे होणं, केस गळणं, केस निर्जीव दिसणं यांसारख्या समस्यांचा समावेश होतो.

दुभंगलेल्या केसांची समस्या दूर करण्यासाठी करा 'हे' उपाय!
बदललेली लाइफस्टाइल आणि हवामानातील वाढलेलं प्रदुषण यांमुळे केसांच्या अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यामध्ये केस पांढरे होणं, केस गळणं, केस निर्जीव दिसणं यांसारख्या समस्यांचा समावेश होतो. पण केसांच्या बाबतीत आणखी एक समस्या होते, ती म्हणजे केस दुभंगण किंवा केसांना फाटे फुटणं. यामध्ये एकच केस दोन भागांमध्ये दुभंगतो. अनेक महिलांमध्ये ही समस्या आढळून येते. मग या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक उपाय करण्यात येतात. बाजारात मिळणाऱ्या रासायनिक उत्पादनांचाही भडिमार करण्यात येतो. तरीदेखील या समस्येपासून सुटका होत नाही. जाणून घेऊयात दुभंगलेल्या केसांची समस्या दूर करण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी...
काही महिलांना सतत शॅम्पूने केस धुण्याची सवय असते. त्यामुळेही दुभंगलेल्या केसांची समस्या उद्भवते. केसांचं सौंदर्य वाढविण्यासाठी सतत केमिकल्स असलेल्या उत्पादनांचा वापर केल्यामुळे केस दुभंगण्याची समस्या उद्भवते.
जर तुम्ही गरम पाण्याने सतत केस धूत असाल तरीदेखील ही समस्या होऊ शकते. याव्यतिरिक्त केसांना कमी तेल लावल्यानंही ही समस्या उद्भवते.
जर तुम्ही खारट पाण्याने केस धूत असाल किंवा स्विमिंग करत असाल तरीदेखील केसांच्या अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं.
दुभंगलेल्या केसांपासून सुटका करून घेण्यापासून काही घरगुती उपाय करू शकता. त्यासाठी पपईच्या गरामध्ये एक कप दही मिक्स करा. त्यानंतर तयार पेस्ट केसांवर लावा. साधारणतः एक तासानंतर केस धुवून टाका. त्यामुळे फायदा होईल.
दही आणि मध एकत्र करून लावल्यानेही ही समस्या दूर होते. एक कप दह्यामध्ये दोन चमचे मध नीट मिक्स करून केसांवर लावा. मधामुळे केसांवर चमक येईल आणि दुभंगलेल्या केसांपासून सुटका होईल.
एरंडेल तेल आणि मोहरीचे तेल समान प्रमाणामध्ये एकत्र करा. त्यानंतर केसांना या तेलाने मालिश करा. त्यामुळे तुम्हाला फायदा होईल. घरात वापरलं जाणारं बदामाचं आणि नारळाचं तेलही यांवर चांगला उपाय आहे. ऑलिव्ह ऑईल थोडं गरम करून लावल्यानं केस मुलायम होतील आणि दुभंगलेले केस कमी होतील.