भारताची फुलराणी लवकरच अडकणार विवाहबंधनात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 11:03 IST2018-09-26T10:57:30+5:302018-09-26T11:03:54+5:30
भारताची फुलराणी सायना नेहवाल आणि बॅडमिंटनपटू पी. कश्यप लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

भारताची फुलराणी लवकरच अडकणार विवाहबंधनात
हैदराबाद - भारताची फुलराणी सायना नेहवाल आणि बॅडमिंटनपटू पी. कश्यप लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. येत्या 16 डिसेंबरला सायना आणि पी.कश्यप लग्न करणार असून जवळच्या 100 लोकांना या खास विवाह सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात येणार आहे. तसेच लग्नानंतर पाच दिवसांनी म्हणजेच 21 डिसेंबरला रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सायना आणि पी. कश्यप हे जवळपास दहा वर्षापासून एकमेकांना डेट करत आहेत. मात्र या दोघांनी कधीही आपल्या नात्याला अधिकृतरित्या दुजोरा दिलेला नाही. काही दिवसांपूर्वी सायनाने पी. कश्यपसोबत शेअर केलेला एक फोटो चर्चेचा विषय ठरला होता. या दोन्ही खेळाडूंच्या घरी लग्नाची जोरदार तयारी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. तसेच हा विवाह सोहळा मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. सायना आणि पी. कश्यप यांच्या आधी सानिया-शोएब, दीपिका पल्लीकल-दिनेश कार्तिक, इशांत शर्मा-प्रतिमा सिंग, गीता फोगट-पवन कुमार, साक्षी मलिक-सत्यवर्त काडयान हे स्टार खेळाडू विवाहबंधनात अडकले आहेत.