रियाद : सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी साऱ्या जगाला गंभीर इशारा दिला आहे. यामुळे जर कच्च्या तेलाचे दर वाढले तर सर्वाधिक फटका हा भारताला बसणार आहे. देशातील पेट्रोल डिझेलचे दर वर्षातील उच्चांकावर आहेत.
सप्टेंबरच्या सुरुवातीला सौदीच्या सरकारी रिफायनरीवर ड्रोन, मिसाईलद्वारे हल्ला करण्यात आला होता. यानंतर अमेरिकेने हा हल्ला ईरानने केल्याचा आरोप केला होता. तर या हल्ल्याची जबाबदारी येमेनच्या हुती विद्रोहींनी घेतली होती. तर सौदीनेही या हल्ल्यामागे ईरान असल्याचे म्हटले होते. सलमान यांनी पहिल्यांदाच या प्रकरणावर वक्तव्य केले आहे.
ईरानमुळे कच्च्या तेलाचा पुरवठा बाधित होणार असून तेलाच्या किंमती एवढ्या वाढतील की या किंमती आम्ही आयुष्यात पाहिल्या नसतील, असा गंभीर इशारा सलमान यांनी दिला. यासाठी ईरान जबाबदार असणार आहे. या देशाविरोधात जगाने एकत्र आले पाहिजे, अन्यथा या किंमतींचा विचार करणेही कठीण जाईल, अशी धमकीच त्यांनी जगाला दिली आहे. सौदीच्या तेलाच्या रिफायनरींवर हल्ला करण्यात ईरानचा हात होता हे दाखविण्यासाठी सौदीमध्ये शस्त्रांचे एक प्रदर्शन भरविण्यात आले होते. यामध्ये दावा करण्यात आला की, एवढी अद्ययावत हत्यारे हुती विद्रोही चालवू शकत नाहीत. मात्र, ईरान या हल्ल्यांमागे हात असल्याचे नाकारत आहे.