‘टेस्ला’ला हवी तिथे जागा देऊ , इतर राज्यांपेक्षा अधिक सवलतीही देणार; महाराष्ट्र सरकारची मोठी ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2023 07:00 IST2023-05-26T06:59:45+5:302023-05-26T07:00:04+5:30
भारतात ईव्ही निर्मितीचा कारखाना उभारण्यासाठी टेस्ला जागा शोधत असल्याचे वृत्त आहे. यापूर्वी भारतात प्रकल्प सुरू करण्यासाठी टेस्लाने आयात शुल्क कपातीची अट ठेवली हाेती.

‘टेस्ला’ला हवी तिथे जागा देऊ , इतर राज्यांपेक्षा अधिक सवलतीही देणार; महाराष्ट्र सरकारची मोठी ऑफर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : इलेक्ट्रिक वाहन निर्मितीत जगात अग्रेसर असलेल्या टेस्ला कंपनीला वाहन निर्मितीचा कारखाना उभारण्यासाठी महाराष्ट्रात कुठेही जागा हवी असेल तर ती उपलब्ध करून दिली जाईल, असे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात मोठे उद्योग यावेत ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह आमच्या सर्वांची भावना आहे. त्यासाठी अशा मोठ्या उद्योगांना इतर राज्यांपेक्षा जादा सवलती देण्यासाठी महाराष्ट्र तयार असल्याचेही सामंत यांनी सांगितले.
भारतात ईव्ही निर्मितीचा कारखाना उभारण्यासाठी टेस्ला जागा शोधत असल्याचे वृत्त आहे. यापूर्वी भारतात प्रकल्प सुरू करण्यासाठी टेस्लाने आयात शुल्क कपातीची अट ठेवली हाेती. मात्र केंद्र सरकारने त्यास नकार दिल्यामुळे हा निर्णय टेस्लाने स्थगित केला होता.
आता भारतात प्रकल्प उभारण्याच्या हालचाली टेस्लाने पुन्हा सुरू केल्याची चर्चा आहे. त्याबाबत मंत्री सामंत यांना विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना या प्रकल्पासाठी महाराष्ट्र सरकार जादा सवलती देण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.
केंद्र सरकारने ठेवली हाेती ‘ही’ अट
n केंद्र सरकारने टेस्लाला भारतात ईव्ही वाहने विकायची असतील तर त्यांना देशातच प्रकल्प उभारावा लागेल, असा सल्लाही दिला होता.
n त्यानंतर आता टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क यांनी सरकारसोबत संपर्क साधला असून, भारतात प्रकल्प सुरू करण्यासाठी स्वारस्य दाखविल्याची चर्चा आहे.
महाराष्ट्राला संधी
राज्यातील काही प्रस्तावित उद्योग बाहेर गेल्याने शिंदे-फडणवीस सरकारवर टीका होत आहे. त्यात टेस्लाचा प्रकल्प महाराष्ट्रात आला तर या सरकारसाठी उपलब्धी असेल.